कातकरी महिलांच्या उत्कर्षासाठी झटताना

कातकरी समाजाच्या एकूण उत्कर्षासाठी महिलांसाठी कशा पद्धतीने काम करता येईल? हे आम्हीही शिकत आहोत. फक्त मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून काम मर्यादित न ठेवता अशा वेगवेगळ्या समोर येईल त्या समस्यांवर काम करणे, हेही आम्ही शिकत आहोत.

Story: विचारचक्र |
01st November 2024, 11:36 pm
कातकरी महिलांच्या उत्कर्षासाठी झटताना

कुठल्याही समाजाची प्रगती, त्या समाजातील स्त्रियांची स्थिती कशी आहे, यावरून ठरवली जाऊ शकते. निरंकाल - फोंडा येथे राहणाऱ्या कातकरी (वानरमारे) वस्तीत काम करताना चांगले वाईट अनुभव गोळा करण्याचे काम चालू आहे. या वस्तीतील महिलांकडे बघितले की या समाजाची स्थिती लक्षात येते.

सतरा अठरा वर्षे वयाची मुलगी म्हटले की आपण कायम पाठीवर दप्तर घेऊन कॉलेज वा उच्च माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या मुलीचीच कल्पना करू शकतो. पण कातकरी वस्तीवरची सतरा वर्षांची मुलगी म्हणजे कायम कुपोषित, किमान दोन तरी मुलांची आई असेल. त्यामुळे एकूणच त्या वस्तीवरच्या मुलांचे कुपोषण, समाजाचे दारिद्र्य लक्षात येते. 

कायम भटकंतीमुळे या समाजाला स्थिरता, आर्थिक व सामाजिक उन्नती कशाचेही देणेघेणे नाही. त्यात स्वत:सोबत समाजाची उन्नती करावी, हा दृष्टिकोन महिलांना आणि समाजालाही नाही. आज स्वयंसेवी संस्थेचे काम करताना महिलांची व मुलांची परिस्थिती मोठे आव्हान होऊन समोर उभे आहे. त्यात मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षणासारखा पर्याय उभा आहे. पण महिलांकरिता काय करावे, आमची आणि त्यांची वेळ कशी जुळवून आणावी, हे मोठे जिकिरीचे काम आहे. तरीही त्यात खूप वेगवेगळे उपक्रम करीत पुढे जाणे क्रमप्राप्त आहे. 

या महिलांची मोठी समस्या ही लग्न लहान वयात होणे, लग्न झाल्यानंतर लगेच मूल होणे व नंतर परत परत कमी अंतराने गरोदर राहणे. यामुळे तिचे स्वत:चे आरोग्य धोक्यात येते, शिवाय झालेली मुलेही कुपोषित. यावर उपाय म्हणून बालविवाह टाळणे, शिक्षणाकडे मुलांना वळवणे व आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी हात देणे गरजेचे आहे.  

महिला आणि मुले सुरक्षित व आरोग्यदायी असण्यासाठी घर महत्वाचे असते. या वस्तीवर पक्की घरे नसल्याने कायम मुले मातीत खेळतात. ऊन, पाऊस, वारा सगळे झेलल्यामुळे मुलांना कायम सर्दी, खोकला चालूच असतो. श्वासनलिकेचा, अन्ननलिकेचा कायम संसर्ग या मुलांना असतो. या सगळ्याला एकाच वेळी उपाय शोधणे आणि तो अमलात आणणे कठीण. त्यामुळे  हळूहळू एक एक गोष्ट करीत गेलो. त्यात वैयक्तिक साफसफाई व वस्तीची साफसफाई दोन्हीवर लक्ष केंद्रित केले. त्यात मुलांची रोज आंघोळ, आहार यावर भर दिला. मुलांची सर्वांगीण काळजी घेण्याचे महत्व तसे या मातांमध्ये अजून रुजलेले नाही. त्यांचे ज्ञानही अल्प. त्यामुळे गरोदरपणापासून ते मुलांच्या बालवयापर्यंत वेगवेगळे डोस, सर्वंकष आहार, त्यांची स्वच्छता या सगळ्याबद्दल परत परत पाठपुरावा करणे गरजेचे होऊन जाते.

मुलांचे व्यसन, महिलांचे व्यसन खास करून पान तंबाखू व गुटखा यासाठी सतत संवाद साधत राहणे गरजेचे आहे. व्यसनांमुळे उद्भवलेले प्रश्न वस्तीभर दृष्टीस पडत आहेत. व्यसनाची  कारणे शोधल्यानंतर अर्धपोटी राहणे, हे प्रमुख कारण म्हणून समोर येते. त्यासाठी कायमस्वरुपी आर्थिक उदरभरणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

कातकरी महिलांच्या उत्कर्षासाठी अडचण ठरणारा अजून एक घटक म्हणजे या समाजाचे टोळीच्या समूहांमध्ये होणारे स्थलांतर. हे स्थलांतर खास करून ऊस तोडणीसाठी सांगे व शेजारच्या राज्यांमध्ये होते. दिवाळीच्या आसपास होणारे स्थलांतरित लोक थेट शिमगोत्सवाला वस्तीवर परत येतात. ऊस तोडणीसाठी कामाला जोड्या लागतात. एकाने ऊस तोडायचे तर दुसऱ्याने ते साफ करायचे. त्याचा मोबदलाही तसाच दोघांना मिळून दिला जातो. त्यामुळे कामाला जाण्याअगोदर इथे वस्तीवरच मध्यम वयाच्या मुलामुलींच्या जोड्या करून दिल्या जातात. त्यासाठी बाहेरगावातून मुली आणल्या जातात किंवा इथल्या मुलींची लग्ने बाहेरगावी जमविली जातात. वय होवो न होवो, हाताला काम यायला लागले की अशा पध्दतीने संसाररथाच्या चाकात ही मुले भरडली जाऊ लागतात. त्यामुळे कुपोषित समाज जन्मास येत राहतो. वेठबिगारीच्या या कामात शोषणाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. 

कातकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे चतुर्थी. मुळात बचतीचे संस्कार नसल्याने ‘आणली पड नी खाल्ली पड’ असा त्यांचा व्यवहार. या स्वभावामुळे हातावरच्या पैशाला हजारो पाय फुटलेले असतात. पावसाळ्यात केलेल्या कामाची शिल्लक टाकून सण साजरा करण्याचे नियोजन नसते. त्यामुळे हा सण साजरा करायला लागणारी रक्कम कुणाकडून तरी उधारीने घ्यावी लागते. ऊस तोडणी करणारे कंत्राटदार हातात पैशांच्या नोटा घेऊन उभेच असतात. हातात पडलेला पैसा कसा खर्च करायचा, याला तारतम्य नसते, कारण ‘चतुर्थी सण मोठा, नाही आनंदा तोटा.’ अंथरूण पाहून पाय पसरणे याचे भान नसल्याने व त्यासाठी पर्यायही उपलब्ध नसल्याने हा समाज या वेठबिगारीत अडकत जातो. चतुर्थी संपली की दिवाळी व नंतर ते पैसे फेडण्यासाठी स्थलांतर. शिवाय पाच महिने कायम रोजंदारी, ज्याची घरी राहिले तर शाश्वती नसते.

अशा क्लिष्ट परिस्थितीमध्ये या महिला कशा उभ्या राहणार, हा प्रश्न कायम आम्हा कार्यकर्त्यांना पडलेला असतो. त्यासाठी कायम आर्थिक सबलीकरणासाठी काही सुरू करायचे तर आम्हा कार्यकर्त्यांच्या हातात आर्थिक सुबत्ता नाही आणि या महिलांच्या हाताला कौशल्य कमी. कसलेही काम झटापट करून हातावेगळे करायची सवय नाही, त्यामुळे आमच्या संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेकडे लक्ष देता देता त्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण अन् आम्ही संयम ठेवणे गरजेचे आहे. 

बचतीचे लहान लहान गट स्थापन करून बचत आणि त्याचे फायदे त्यांना पटवून देणे, बँकेमध्ये खाते उघडणे, आपल्या गरजा अन् आपली मिळकत याचे गणित बसविणे अशा अनेक गोष्टी त्यांच्या गळी उतरविणे कसे जमणार, हे बघायला हवे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजाच्या एकूण उत्कर्षासाठी महिलांसाठी कशा पध्दतीने काम करता येईल? हे आम्हीही शिकत आहोत. फक्त मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून काम मर्यादित न ठेवता अशा वेगवेगळ्या समोर येईल त्या समस्यांवर काम करणे, हेही आम्ही शिकत आहोत.


नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या 

व साहित्यिक आहेत.)