शर्महदला फासावर लटकवून इराणचे जर्मनीशी वैर

Story: विश्वरंग |
01st November 2024, 11:32 pm
शर्महदला फासावर लटकवून इराणचे जर्मनीशी वैर

इराणने इस्रायलनंतर आणखी एका देशासोबत पंगा घेतला आहे. जर्मन कैदी जमशेद शर्महद, ज्यांचे २०२० मध्ये दुबईमध्ये इराणी सुरक्षा दलांनी अपहरण केले होते, त्यांना दहशतवादाच्या आरोपात दोषी ठरविल्यानंतर इराणमध्ये फासावर लटकवण्यात आले. जमशेद ही व्यक्ती मूळची जर्मन नागरिक आहे. इराणच्या या कृतीवर जर्मनीने संताप व्यक्त केला असून जर्मन नागरिकाला फासावर लटकवण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बैरबॉक यांनी दिली आहे.

जमशेद शर्महद ६८ वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर होते. ग्लेन्डोरा, कॅलिफोर्नियात राहणाऱ्या शर्महद यांना इस्रायलच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी फाशी देण्यात आली. शर्महद जर्मन नागरिक होते, ते अमेरिकेत वास्तव्याला होते. शर्महदवर २००८ मध्ये शिराज येथील एका मशिदीवरील हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप इराणने केला आहे. ज्या हल्ल्यामध्ये पाच महिला आणि एका लहान मुलासह १४ लोक मारले गेले आणि २१५ हून अधिक जखमी झाले होते. २०२० मध्ये यूएई यात्रेदरम्यान इराणच्या एजंट्सनी त्यांचे अपहरण केले व त्यांना जबरदस्तीने इराणला घेऊन आले. फेब्रुवारी २०२३ मध्ये इराणच्या न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप करत त्यांना मृत्यूची शिक्षा सुनावली. शर्महद यांना टोंडर नामक एक राजशाही समर्थक समूहाचे नेतृत्व केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.

अल्प-ज्ञात किंगडम असेंब्ली आणि त्याच्या तोंडर या दहशतवादी विंगने २०१७ मध्ये इराणच्या अर्धसैनिक रिव्हॉल्युशनरी गार्डच्या क्षेपणास्त्र साइट्सवर गुप्त माहिती उघड केल्याचा आरोप इराणने केला आहे. 

शर्महद यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप वारंवार फेटाळले होते. साक्षीच्या आधारावरही हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. ते अमेरिकेचे ग्रीन कार्डधारक होते. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना फाशी देण्यात आली. आपल्या नागरिकाला इराणमध्ये फाशी झाल्यानंतर जर्मनीने कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे. ‘ही फाशी नव्हे, हत्या’ असल्याचे जर्मनीने म्हटले आहे. एका जर्मन नागरिकांना फासावर देण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हे आम्ही तेहरानला स्पष्ट केलेय, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बैरबॉक यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तर इराणमधील अमेरिकी दूत अब्राम पेली यांनी या फाशीला घृणास्पद कृत्य ठरवले आहे.


सुदेश दळवी, गोवन वार्ता