पणजी : पुनितकुमार गोयल यांची नियुक्ती राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सचिवपदी झाल्यानंतर डॉ. व्ही. कांडावेलू यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आहे.
१९९७च्या 'अॅग्मूट' केडरचे आयएएस अधिकारी डॉ. व्ही. कांडावेलू हे राज्याचे अर्थ सचिव आहेत. या सोबतच खाण तसेच नियोजन व सांख्यिकी खात्याच्या सचिवपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ते प्रधान सचिवदेखील आहेत.
दहा दिवसांपूर्वीच पुनितकुमार गोयल यांच्या राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सचिवपदी नियुक्तीचा आदेश जारी झाला होता. जुलै २०१९मध्ये गोव्यात बदली झाल्यानंतर १ फेब्रुवारी २०२२ रोजी गोयल हे राज्याचे मुख्य सचिव झाले होते. जमीन रूपांतरण प्रकरणी उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल झाल्याने ते वादात सापडले होते.