ओटावा : खलिस्तानी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनेडीयन संसदेत केला होता तेव्हा पासून भारत आणि कॅनडाचे द्वीपक्षीय संबंध बिघडलेत. आता जस्टिन ट्रूडो यांच्या एका मंत्र्याने भारतावर धक्कादायक आरोप केलेत. 'भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी कॅनडातील खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.' असे विधान कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी मंगळवारी संसदीय पॅनेलमध्ये केले.
गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, तेव्हा त्यांच्याकडे केवळ गुप्तचर माहिती होती मात्र कोणताही ठोस पुरावा नव्हता. दरम्यान वॉशिंग्टन पोस्टने १४ ऑक्टोबर रोजी कॅनडाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत गृहमंत्री अमित शहा यांनीच खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करण्याचे आदेश दिला असा लेख प्रसिद्ध केला होता.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी या प्रकरणावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, भारत सरकारने कॅनडाचे यापूर्वीचे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत यामध्ये भारताचा संबंध असल्याच्या शक्यता फेटाळून लावल्या.