गोव्यातला ‘धेणलो’ उत्सव

काही ठिकाणी लाकडी जुन्या चौकटीत बालकृष्णाची प्रतिमा स्थानापन्न करून तिला फुलांनी सुरेख सजवून माथ्यावर धारण करून घरोघरी नेले जाते. काही जाग्यांवर लाकडाच्या रथाला गुढ्यातोरणांनी सजवून त्यात बालकृष्णाची मूर्ती पुजली जाते.

Story: विचारचक्र |
30th October 2024, 12:06 am
गोव्यातला ‘धेणलो’ उत्सव

गोव्यात सध्या शरद ऋतूचे मंतरलेले कृष्ण पक्षातले दिवस निरोप घेताना दि‌वाळीच्या प्रकाशपर्वाचे आगमन चतुर्दशीला झालेले आहे. शारदीय आश्रिवन संपून, ज्या दिवशी कार्तिक मासारंभ सुरू होतो त्यावेळी बलिप्रतिपदा साजरी केली जाते. प्रजाहितदक्ष आणि कृषी परंपरेचा पुरस्कर्ता आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना राजाश्रय देणाऱ्या महाबलीप्रीत्यर्थ हा पर्वदिन गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत उत्साहाने साजरा केला जातो. गोव्यात प्रतिपदेचा हा दिवस म्हणजे वेळीप या जंगलनिवासी आदिवासी कुमारिकांचा ‘धिलोत्सव’, शेतकरी जातीजमातींचा ‘गोरवा पाडवा’ आणि आदिवासी गावडाबहुल प्रांतात ‘धेणलो’ अशा तीन स्वतंत्र उत्सवांच्या मनोज्ञ संगमाचा आविष्कार अनुभवायला मिळतो. कार्तिकातला हा पहिला दिवस खरे तर विक्रम संवत्सराचा नववर्षदिन. अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री धनसंपत्तीची अधिष्ठात्री महालक्ष्मीचे पूजन चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी केल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो, तो नववर्षाचा पहिला दिवस होऊनच.

पावसाळी भातशेतीतील दाणेगोटे घरात आल्याने शेतकरी आनंदीत झाले‌ला असतो. नव्या भातापासून घरात आणलेल्या पोह्यांच्या वेगवेगळ्या रुचकर पक्वान्नांचा आस्वाद घेतल्यानंतर कष्टकरी लोकमनाला धेणलोचे वेध लागतात. ‘धेणलो’ उत्सवातील माथ्यावर फुलांनी सजवलेल्या लाकडी चौकटीतली बालकृष्णाची मिरवणूक काढ‌ण्याची लोकपरंपरा एकेकाळी चोडण बेटाचे ग्रामदैवत असलेल्या देवकीकृष्णाचे स्थलांतर अंत्रूज महालातील वरगावच्या माशेलात झालेल्या घटनेशी निगडित आहे की, तो स्वतंत्र पारंपरिक लोकविधी आहे, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. पूर्वी जेव्हा बालविवाहाची प्रथा रूढ होती, तेव्हा नवरा-नवरीस खांद्यावर बसवून लोकगीते म्हणत ‘धेंडा’ नाचवण्याचा लोकाचार प्रचलित होता. खांद्यावर‌ किंवा डोक्यावर ‘धेंडा’ नाचवण्याच्या लोकाचारातून धेणलो हा शब्द रूढ झाला असावा आणि त्यातून धेणलो उत्सवाची परंपरा उन्नत झाली असावी. श्रीकृष्ण या महाभारतकालीन पुरुषोत्तमाला भारतीय लोकधर्माने शेकडो वर्षांपूर्वी देवत्व प्रदान केले आणि विविध रूपांत त्याची पूजा सण-उत्सव करण्याला प्राधान्य दिले. ओडिशातील जनजाती आणि जमाती यांनी तीन लाकडी ओंडक्यांच्या स्वरूपातल्या तत्वाला कृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा म्हणून पुजले तर मूळ कानडा अस‌णाऱ्या विठ्ठलाला पंढरीच्या पांडुरंगाच्या रुपात पुजले. गोव्यावर वैष्णव धर्म परंपरेचा विशेष प्रभाव पडला आणि त्याद्वारे देवकीकृष्ण मांडवी नदीने चारही बाजूंनी वेढलेल्या चोडण बेटाचा अधिपती ठरला, तर कर्नाटकातल्या घाटमाध्यावरील, त्याचप्रमाणे काणकोणच्या अंबा घाटमार्गे जाणाऱ्यांना नेत्रावळीतील गोपिनाथ प्रणेता देव ठरला. बालकृष्णाच्या लाघवी आणि वत्सल रूपाची लोकमानसावर इतकी मोहिनी की सक्तीने ख्रिस्ती धर्मांतरित झालेल्यांसाठी प‌र्याय म्हणून ख्रिस्ती धर्मगुरूंनी मेरीच्या कडेवर असलेल्या जिझसचे बालरूप प्रदान केले. देवकीच्या कडेवर असलेला बालकृष्ण आणि मेरीमातेच्या कडेवर असलेला इन्फन्ट जिझस ही जरी भिन्न संस्कृतीतून आलेली दैवते असली तरी नव ख्रिस्त्यांना आपल्या वैष्णव परंपरेतल्या परमतत्वाचा वारसा गवसला. 

बलिप्रतिपदे दिवशी श्रीकृष्ण पूजनाची वैविध्यपूर्ण परंपरा फोंडा - तिसवाडी तालुके आणि परिसरात पहायला मिळते. त्याला इथल्या लोकमानसावर पूर्वापार असलेल्या देवकीकृष्णाचे गारूड की कृषक-पशुपालक जातीजमातींशी संबंधित गोपालकृष्णाविषयीची भक्तीभावना कारणीभूत ठरली हे सांगणे कठीण आहे. महाभारत कालखंडात झालेले श्रीकृष्ण आणि बलरामाचे झालेले आगमन भारतीय उपखंडातील शेती-बागायतींना ऊर्जा देण्यास कारणीभूत ठरले. गुराढोरांना गायराने, गोठणी, कुरणे, माळरानावर चरायला नेऊन आपल्या बासुरीच्या मधुर सुरावटीद्वारे श्रीकृष्णाने मंत्रमुग्ध केले होते. पशुपालक जातीजमातींना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे योगदान श्रीकृष्णाने केले, तर त्याचा बंधू बलरामाने नांगराद्वारे भूमीची नांगरणी करून या सुफलतेत अभिवृद्धी केली आणि त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि आदरभाव दिवाळीच्या पर्वकाळात करणे इथल्या लोकमानसाने उचित मानले.

घरोघरी गाईगुरांच्या शेणाच्या गोळ्याला मोसमी रानफुलांनी अलंकृत करण्याबरोबर कारिटापासू‌न गुरांचा गोठा तयार केला जातो. कांबळ आणि काठी हाती घेत‌लेल्या गुराख्याची प्रतिकृती केली जाते. गुराढोरांना चवरमांड्याच्या सालीपासून तयार केलेले गोंडे आंघोळ करून, गंधपुष्प अर्पण केल्यावर गळ्यात घातले जातात. तांदूळ आणि उडिदाचे पीठ एकत्र करून काढलेल्या आंबोळ्या (पोळे) यांचे जेवण दिले जाते. काही ठिकाणी गुरांच्या गळ्यात वड्यांची माळ बांधली जाते आणि त्यातले वडे मिळवण्यासाठी तरुण गुराखी कसरत करण्यात धन्यता मानतात. काही ठिकाणी लाकडी जुन्या चौकटीत बालकृष्णाची प्रतिमा स्थानापन्न करून तिला फुलांनी सुरेख सजवून माथ्यावर धारण करून घरोघरी नेले जाते. काही जाग्यांवर लाकडाच्या रथाला गुढ्यातोरणांनी सजवून त्यात बालकृष्णाची मूर्ती पुजली जाते आणि ढोलताशांच्या निनादात ही मिरवणूक गावातील आबालवृद्धांना आपल्या उत्साहात एकरूप करून घेते.

धेण धेणलो पावस खंय शेणलो?

धेणल्याली म्हातारी शेळेहून खाताली

धेण धेणलो....

धेणल्या पावस शेणलो

गोविंदा s s s गोविंदा

असे उच्चरवाने ‘धेणलो’ उत्सवात सहभागी गातात आणि नाचतात. कणसांनी युक्त शेताच्या निर्मिती प्रक्रियेत मानवी कष्टाबरोबर अदृश्य शक्तीचा हात आहे, अशी भावना आदिम अवस्थेपासून मानवात आहे. या अदृश्य शक्तीची कृपा असेल तर पाऊस-पाणी व्यवस्थितीत पडेल आणि पिकाची चांगली पैदासी होईल, या भाबड्या आशेने कष्टकरी स‌माज बालकृष्णयुक्त धेणलो घरोघरी नाचवून हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या वायंगणी शेतीत सुफलतेची अपेक्षा करत असतो. गोव्यातील धेण‌लो उत्सवाच्या कालावधीत इथला कष्टकरी समाज उत्स्फूर्तरित्या सहभागी होऊन आपल्या शेतात चांगल्या पिकाबरोबर योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी, अशी आशा बाळगतो.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५