देश। पश्चिम बंगालसह ओडीशाला डाना चक्रीवादळाची भीती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd October, 09:48 pm
देश। पश्चिम बंगालसह ओडीशाला डाना चक्रीवादळाची भीती

कोलकाता : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा धोका लक्षात घेता, खबरदारी म्हणून बंगाल सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्य सचिवालयात चक्रीवादळाच्या संदर्भात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

त्याचबरोबर ओडिशामध्ये चक्रीवादळाबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यासोबतच राष्ट्रपतींचा नियोजित दौराही रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओडीआरएएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना २४ आणि २५ ऑक्टोबरला पुरीला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चार दिवस शाळा, महाविद्यालये बंद

डाना चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि आसपासच्या नऊ जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बुधवार ते शनिवार बंद राहणार आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीच्या घोषणेनंतर त्याची अधिसूचनाही शालेय शिक्षण विभागाने जारी केली. त्यात नमूद केलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, बांकुरा, हुगळी, हावडा आणि कोलकाता यांचा समावेश आहे. २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत या जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

हेही वाचा