दुचाकी, कारचालकांना मारहाण : पोलिसांवर दगडफेकीचे आरोप
मडगाव : सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत शनिवारी मडगावात मोठे आंदोलन झाले. यावेळी रस्ते बंद करण्यात आले होते. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो, सावियो कुतिन्हो, फिडोल परेरा यांच्यासह सुमारे ५०० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आंदोलकांची ओळख पटेल तशी नावांची नोंद केली जाणार आहे.
मडगावात शनिवारी वेलिंगकर यांच्या अटकेसाठी निदर्शने करण्यात आली. अटक होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी मडगावातील ओल्ड मार्केट जंक्शन, एसजीपीडीए मार्केट, केएफसी इमारत जंक्शन याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केली. यामुळे वाहतूक कोंडी होऊन सामान्य जनतेला याचा फटका बसला. जमावाने नियाज अहमद यांच्यासह आणखी दोन दुचाकीचालकांना मारहाण केली. अडथळे आणून रस्ते बंद केले, नागरिकांशी हुज्जत घातली तसेच ओल्ड मार्केट परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. याप्रकरणी अॅड. प्रतिमा कुतिन्हो, सावियो कुतिन्हो, फिडॉल परेरा, ज्योएल, सावियो डायस, जोयसी डायस, मेश्यू डिकॉस्टा, पीटर व्हिएगस, सबिता मास्कारेन्हस, फ्रँकी डिमेलो, कार्मिन, वॉरन, एव्हरसन वाझ, फ्रेडी ट्राव्हासो, पॉल फर्नांडिस, फ्रँकी गोम्स, क्लाइव्ह कार्दोज, नेव्हिल फर्नांडिस यांच्यासह पाचशे जणांवर बेकायदा जमाव करणे, सार्वजनिक रस्ते बंद करणे, सरकारी आदेशाचा अवमान करणे, मानवी सुरक्षितता धोक्यात येण्यासारखी कृत्य करणे, अडवणूक करणे, सरकारी कर्मचार्यांच्या कर्तव्यात बाधा आणत हल्ला करणे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रविवारी चिंचणी, लोटलीतही अटकेसाठी निदर्शने
सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेसाठी रविवारी मडगावातील आंदोलन काही तासांत मागे घेण्यात आले. याशिवाय चिंचणी व लोटली परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी निदर्शने केली. हातात फलक घेत घोषणाबाजी करत वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली.
अटक न झाल्यास लोक कायदा हातात घेतील : चर्चिल
सर्वधर्मीय लोक गोव्यात सुखाने राहत आहेत, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होता नये. वेलिंगकर यांच्यामुळे लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दोन दिवसांत वेलिंगकर यांना अटक न झाल्यास लोक कायदा हातात घेतील. याची जबाबदारी राज्य सरकारची असेल. त्यामुळे सरकारने त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली.