एकाची प्रकृती चिंताजनक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बार्देश गिरी येथील ग्रीनपार्क जंक्शनजवळील सर्व्हिस रोडवर दोन दुचाकींना मोटारसायकलने मागून ठोकर दिली. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यातील दोघांवर उपचार सुरू आहेत.
हा अपघात मंगळवारी उत्तररात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. पल्सर व अॅक्टिवा या दुचाकीवरून दत्ता रावळ (३६, रा. मये) व राजेश नाईक (३१, रा. मये) हे दोघेही बागा-कळंगुटहून गिरीमार्गे घरी चालले होते. हे दोघेही बागा येथे नोकरी करतात. ते ग्रीन पार्क जंक्शन काढून काही अंतरावर पोहोचले, तेव्हा मागून येणाऱ्या केटीएम मोटारसायकलने दोन्ही दुचाकींना जाेरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल नोवेल रमेश धुपदाले (३८, रा. बस्तोडा) व सनी संजय धुपदाले (२९, रा. पेडे-म्हापसा) हे दोघेही उसळून रस्त्यावर कोसळले व गंभीर जखमी झाले.
जखमी नोवेल धुपदाले याच्यावर गोमेकॉत, तर सनी धुपदाले याच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी दत्ता व राजेश या दोघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार विजय गडेकर यांनी केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.