गोवा : गतवर्षीच्या तुलनेत अपघातांत १० टक्क्यांनी घट

दिवसाकाठी ७ अपघात, तर सरासरी ३१ तासांत एकाचा अपघाती मृत्यू


02nd October, 12:10 am
गोवा : गतवर्षीच्या तुलनेत अपघातांत १० टक्क्यांनी घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १,९२८ अपघातांची नोंद झाली आहे. यांतील १९५ भीषण अपघातांत २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत २१६ (१०.०७ टक्के) अपघात आणि अपघाती मृत्यू १० (४.५६ टक्के) कमी झाले आहेत. दिवसाकाठी सरासरी ७ अपघात, तर ३१ तासांत सरासरी एकाचा अपघाती मृत्यू होत आहे.
राज्यात यावर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या २७४ दिवसांमध्ये १,९२८ अपघात झाले आहेत. यात १९५ भीषण अपघात आहेत. वरील कालावधीत एकूण २०९ जणांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. १५१ अपघातांत २०१ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ३६५ किरकोळ अपघातांत ५९७ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय १,२१७ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षात, २०२३ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत राज्यात २,१४४ अपघात झाले होते. त्यांतील २०२ भीषण अपघातांत २१९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी १९१ अपघातांत २८५ जणांना गंभीर, तर ३९१ अपघातांत ६१३ जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. शिवाय १,३६० वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. वरील २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत राज्यात २१६ अपघात कमी झाले आहेत. तसेच अपघाती मृत्यूही १० कमी झाले आहेत. तसेच ४० गंभीर अपघात आणि २६ किरकोळ अपघातही कमी झाले.
राज्यात अपघाती मृत्यू रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा ऱ्यांवर कारवाई करण्यासह वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी जागृती केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे. त्यात प्रामुख्याने दारू पिऊन वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न घालणे, वाहनांना काळ्या काचा लावणे अशा प्रकारांचा समावेश आहे.