मंत्री हळर्णकर करणार पाहणी : मडगावातील बैठकीत घेतला आढावा
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला उपस्थित मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री आलेक्स सिक्वेरा व अधिकारी.
मडगाव : कुटबण जेटीवरील कॉलराच्या साथीमुळे अनेक कामगारांची तब्येत बिघडली असून अजूनही आवश्यक स्वच्छतागृहे नसल्याने तत्काळ जादा स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याप्रश्नी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही लवकरच पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासह मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही अधिकार्यांकडून कुटबण जेटीवरील सुविधा व कामगारांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेतली. कॉलराची आतापर्यंत १७२ जणांना लागण झाल्याचे आरोग्य विभागाकडे नमूद आहे. पण खासगी इस्पितळात उपचार घेणार्यांची संख्या त्यात जोडलेली नाही. तसेच ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत त्यावरील कामगारांना कॉलराची लागण झालेली आहे का, याचीही माहिती नाही. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांकडून सद्यपरिस्थितीतील उपाययोजनांवर चर्चा केली. सध्या ५० सीटर सेन्सरवाली स्वच्छतागृहे बंद असल्याने केवळ १३ स्वच्छतागृहांचा वापर केला जात आहे. याशिवाय अतिरिक्त शौचालयांची आवश्यकता आहे. त्यामुळे ती उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्री हळर्णकर यांनी सांगितले की, कुटबण व मोबोर येथील कॉलराच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आरोग्य विभागासह बोटमालकांना व कामगारांना वैयक्तिक स्वच्छता व शौचालयांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांना कॉलराची लागण झालेली आहे त्यांना उपचार दिले जात आहेत. याशिवाय जेटीवरील ज्या आरोग्य सुविधा आवश्यक आहेत त्या उपलब्ध करण्यावर लक्ष दिला जात असल्याचे सांगितले. जेटीवरील कित्येक वर्षांपासून उभ्या बोटी हटवण्याचे व जेटीच्या स्वच्छतेची कामे हाती घेतलेली आहेत.
बांधकामे पाडण्यास स्थानिकांचा विरोध
कुटबण जेटीवरील काही बांधकामे व दुकाने ही बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली आहेत. जेटी उभारताना दुसरीकडे जागा दिल्यानंतरही अजूनही जेटीवर अतिक्रमण करत जागा मालकांकडून व्यवसाय केले जात आहेत व वास्तवही आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून अतिक्रमणे हटवण्यास सांगितलेले आहे. पण स्थानिकांनी अतिक्रमणाचा मुद्दा नसताना काही बोटमालकांकडून मुद्दाम यात राजकारण करत हा मुद्दा पुढे केल्याचे सांगत आस्थापने हटवणचयास विरोध केला आहे. त्यांनी आमदार क्रुझ सिल्वा यांचीही भेट घेऊन हा मुद्दा मांडलेला आहे.