पदाचा गैरवापर करून सरकारची आर्थिक फसवणूक केल्याचा आहे ठपका.
पणजी : पणजी स्मार्ट सिटीचे माजी एमडी आणि सीईओ स्वयंदिप्ता पाल चौधरी यांनी ८२.८७ लाख रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डिव्हलपमेंट लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मामू हागे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित स्वयंदिप्ता पाल चौधरी हा १ एप्रिल २०१८ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत आयपीएससीडीएलचे एमडी आणि सीईओ म्हणून कार्यभार सांभाळत होता. त्या काळात त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचा अनधिकृत वापर करून अफरातफर केल्याचे म्हटले आहे. त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे २७.५० लाख रुपयाच्या स्वत:च्या फायद्यासाठी अनियमित खर्च केला. तसेच तुटपुंज्या रोख खात्यातून १.०६ लाख रुपयांचा वैयक्तिक खर्चदेखील केले.
याशिवाय चौधरी याने मंडळाची परवानगीशिवाय आणि एकाच कामासाठी अनेक सल्लागारांची नियुक्ती केली होती. त्यासाठी त्याने बनावट बिल तयार करून रक्कम अदा केली होती. वरील सर्व प्रकारामुळे चौधरी याने सरकारचे ८२.८७ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली होती. याची दखल घेऊन एसीबीचे उपअधीक्षक राजन निगळे याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर यांनी संशयित पणजी स्मार्ट सिटीचे माजी एमडी आणि सीईओ स्वयंदिप्ता पाल चौधरी याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.