सांताक्रूझ प्राणघातक हल्लाप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th September, 12:17 am
सांताक्रूझ प्राणघातक हल्लाप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

पणजी : सांताक्रूझ येथे पूर्ववैमनस्यातून लतिफ तलवाई (२५, इंदिरानगर-चिंबल) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित राजीव शर्माने तलवाई याला पकडून ठेवल्यानंतर त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
या प्रकरणी चिंबल येथील लतिफ तलवाई यांनी तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. सांताक्रूझ येथील कोको चीन बारजवळ संशयित राजीव शर्माने त्याला पकडल्यानंतर संशयित अनिल गुदिन्हो याने त्याच्या पोटावर तसेच इतर ठिकाणी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. तर सुनील गुदिन्हो आणि इतर तिघांनी त्याच्या डोक्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या व त्याला जबर मारहाण केली. त्यात तक्रारदार गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती जुने गोवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तलवाई याची तक्रार नोंद करून गुन्हा दाखल केला. याच दरम्यान पोलिसांनी जुने गोवा येथून संशयित अनिल गुदिन्हो आणि एका अल्पवयीन मुलाला तर सांगली-महाराष्ट्र येथून संशयित सुनील गुदिन्हो आणि राजीव शर्मा यांना ताब्यात घेऊन संशयित अनिलसह सुनील आणि राजीव यांना अटक केली. तर अल्पवयीन मुलाची मेरशी येथील अपना घरात रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणातील संशयित राजीव शर्मा याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून आपल्याला नाहक गुंतवण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित शर्माने तक्रारदार तलवाईला प्रथम पकडून ठेवला. त्यानंतर इतरांना त्याला मारहाण केल्याचे समोर आले. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित राजीव शर्मा याच्या सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन फेटाळून लावला.             

हेही वाचा