फोंडा : फोंडा शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गेल्या कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. विविध भागात बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्यांची वेळोवेळी दुरुस्ती झाली नसल्याने सर्व कॅमेरे सध्या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असतात. परंतु शहरातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी खासगी दुकानातील कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शहरात आवश्यक ठिकाणी लवकर सीसी कॅमेरे बसविण्याची मागणी लोकांकडून होत आहे.
फोंडा शहरात काही वर्षांपूर्वी दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी खासदार निधीतून एकूण २२ सीसी कॅमेरे बसविण्यात आले होते. सीसी कॅमेऱ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली होती. परंतु त्या एजन्सीकडून सीसी कॅमेऱ्यांची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याने सर्व सीसी कॅमेरे काही वर्षातच बंद पडले होते. त्यानंतर शहरातील सर्व सीसी कॅमेरे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. शहरात सीसी कॅमेरे नसल्याने अनेकवेळा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना खासगी दुकानातील सीसी कॅमेऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात. सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त बनले होते. वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना सीसी कॅमेऱ्याच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई पोलिस करीत होते. परंतु सर्व कॅमेरे बंद पडल्याने पोलिसांना रस्त्यावर राहून दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. फोंडा शहरात वाढती वाहनांची वर्दळ तसेच वाढते गुन्हे लक्षत घेता सीसी कॅमेरे काळाची गरज बनली आहे.
गेल्या काही वर्षात फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एखादा तपास करताना पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता अधिक असते. पण शहरातील सीसी कॅमेरा बंद असल्याने पोलिसांना खासगी दुकानातील सीसी कॅमेऱ्याचा आधार घ्यावा लागत असतो. त्यामुळे फोंडा पोलिसांनी अनेकवेळा संबंधित खात्याकडे तसेच फोंडा पालिकेकडे अनेकवेळा सीसीटीव्ही बसविण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. पण अजून पर्यंत सीसी टीव्ही कॅमरे बसविण्यात आले नसल्याने पोलिसांची धावपळ उडत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सरकारने त्वरित दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.