जपानला नमवून भारतीय हॉकी संघाचा सलग दुसरा विजय

आशियाई चॅम्पियन्स करंडक : सुखजीत, अभिषेकचे धडाकेबाज गोल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
09th September, 10:05 pm
जपानला नमवून भारतीय हॉकी संघाचा सलग दुसरा विजय

भूवनेश्वर : गतविजेत्या भारतीय संघाने अ गटातून जापान संघावर मात करताना आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पहिल्या लढतीत भारतीय संघाने चीनला पराभूत केले होते.
सोमवारी झालेल्या लढतीत भारताने जापान संघावर ५-१ असा विजय मिळविला. भारताच्या सुखजीतने पहिल्याच मिनिटाला गोल करताना भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या मिनिटालाच सुखजीतची कामगिरीची अभिषेकाने पुनरावृत्ती घडविली.
अभिषेकाने दमदार असा मैदानी गोल करताना भारताला २-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पेनल्टी कॉर्नरवर भारताच्या संजयने तिसऱ्याच्या चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलून भारताची आघाडी ३-० अशी वाढविली.
त्यानंतर मात्र जापान संघाने जोरादार प्रतिहल्ला करण्यास सुरूवात केली. जपानच्या मात्सुमोतो काझूमसाने तिसऱ्या सत्रातील चौथ्या मिनिटाला गोल करताना जापानचे खाते उघडले. त्यानंतर काहीच मिनिटामध्ये जरमनप्रीतच्या पासवर भारताच्या उत्तम सिंगने भारतासाठी चौथा गोल केला. यावेळी भारताने ४-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. चौथ्या सत्रात भारताच्या सुखजीतने जापानचा बचाव भेदताना चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला.
भारत अ गटात अव्वल स्थानी
भारताने स्पर्धेतील दोन्ही लढतीत मिळून ८ गोल केले असून केवळ १ गोल स्वीकारला आहे. अ गटात भारत अग्रस्थानी असून पुढील लढतीमध्ये भारतासमोर मलेशिया संघाचे आव्हान असणार आहे. ही लढत बुधवारी होणार आहे.