राष्ट्रीय महामार्गावरच्या वीज खांब्यावरील होर्डिंग्ज दोन आठवड्यात काढा !

गोवास्थित मुंबई उच्च न्यायालय : होर्डिंग्जमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th September, 12:28 am
राष्ट्रीय महामार्गावरच्या वीज खांब्यावरील होर्डिंग्ज दोन आठवड्यात काढा !

पणजी : मेरशी ते जुने गोवा आणि मेरशी ते बांबोळी क्राॅस पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील वीज खांब्यावरचे होर्डिंग्ज दोन आठवड्यात काढा, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित कंत्राटदार कंपनीला दिला आहे. याबाबतचा आदेश न्या. मकरंद एस. कर्णिक आणि न्या. वाल्मिकी मिनिझीस या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.

रस्त्यांच्या बाजूला तसेच नद्यांच्या तीरावर मोठी होर्डिंग्ज उभारली जात आहेत. ठोस यंत्रणा नसल्यामुळे कुठेही होर्डिंग्ज उभारण्यात येत असून याला आळा घालण्यासाठी न्यायालयाने २००७ मध्ये स्वेच्छा दखल घेतली होती.

संबंधितांना वेळोवेळी बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाईचे निर्देश दिले होते. न्यायालयाला मदत करण्यासाठी ज्येष्ठ वकील एस. डी. लोटलीकर यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती झाली आहे.

दरम्यान रस्त्याच्या दुभाजकाच्या तसेच बाजूला वीज खांब्यावर होर्डिंग्ज उभारण्यात येत असल्याचा मुद्दा अॅमिकस क्युरी लोटलीकर यांनी न्यायालयात मांडला होता. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावून त्यांनी कुठल्या यंत्रणेकडून परवानगी घेतल्याची माहिती सादर करण्यास सांगितले होते.

या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, रस्त्याच्या दुभाजकाच्या वीज खांब्यावर उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे वाहन चालकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

तसेच मागील काही महिन्यांत त्या ठिकाणी नवीन होर्डिंग्ज उभारण्यात आल्याची माहिती दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने मेरशी ते जुने गोवा आणि मेरशी ते बांबोळी क्राॅस पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या दुभाजकाच्या मध्येच वीज खांब्यावर उभारलेले होर्डिंग्ज दोन आठवड्यात काढण्याचा आदेश दिला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी होणार आहे.