लखनाडोन : मध्य प्रदेशात कोट्यवधी रुपयांच्या आयफोनची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. येथे बदमाशांनी कंटेनर ट्रक चालकास हातपाय बांधून ओलीस ठेवत, त्यात भरलेले ॲपल कंपनीचे तब्बल १६०० महागडे मोबाईल लुटले. चोरी झालेल्या एकूण मालाची किंमत १२ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी ॲपल कंपनीचे महागडे मोबाईल घेऊन युपी १४ पीटी०१०३ क्रमांकाचा कंटेनर हैदराबाद येथून उत्तर भारताच्या दिशेने निघाला होता. यात कंटेनर चालकासह एक सुरक्षारक्षक देखील होता. दरम्यान लखनाडोन येथे पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षक चहा पिण्यासाठी उतरला. यावेळी त्याने चालकाशी एका व्यक्तीची ओळख करून दिली. त्यास सोबत घेऊन ट्रक चालक इच्छितस्थळी रवाना झाला. ट्रकचालकाला झोप लागल्याने त्याने रात्री कंटेनर बाजूला उभा करून झोपला. दोन्ही सुरक्षा रक्षकही झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्टला कंटेनर चालकाला जाग आली तेव्हा ते बंदरी या ठिकाणी होते. त्याचे हात, पाय व तोंड बांधलेले होते. कसेबसे चालकाने हातपाय मोकळे करून कंटेनरकडे वळून पाहिले तर त्याचे गेट उघडे होते व व १२ कोटी किंमत असलेले तब्बल १६०० मोबाईल फोन गायब झाले होते. कंटेनरमध्ये बसलेले दोन्ही सुरक्षा रक्षक बेपत्ता असल्याचे आढळून आले.
कंटेनर चालकाने तात्काळ बंदरी पोलीस स्थानक गाठून आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केले. या प्रकरणाची माहिती महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांना मिळताच त्यांनी वांद्री पोलीस ठाणे गाठले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी कामात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी लखनाडोन-झाशी महामार्गावरील टोल नाक्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. ॲपल कंपनीचे अधिकारी, ट्रान्सपोर्ट कंपनी, सुरक्षा रक्षक आदींची चौकशी करण्यात आली. घटनेची सर्वच भागात चौकशी सुरू आहे. तसेच बंदरी पोलीस स्थानकाच्या प्रभारींसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे काढून टाकण्यात आले आहे.