हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; एमबीबीएस विद्यार्थ्यास न्यायालयाचा दिलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11th August, 01:29 pm
हजेरीपट कमी असतांनाही परीक्षेस बसण्यास मोकळीक; एमबीबीएस विद्यार्थ्यास न्यायालयाचा दिलासा

पणजी : एमबीबीएस प्रथम वर्षात एका विषयात आवश्यक हजेरीपट कमी असल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सदर विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास मोकळीक दिली आहे. तर त्याच्या निकाल बंद लिफाफात ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

या प्रकरणी लक्षी जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात त्यांनी राज्य सरकार, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा विद्यापीठ आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला प्रतिवादी केले होते. याचिकादार जैन गोमेकॉच्या प्रथम वर्ष एमबीबीएस वर्गात शिक्षण घेत आहेत. शरीरशास्त्र विषयाची परीक्षा १२ आणि १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. शरीरशास्त्र विषयात आवश्यक हजेरी कमी असल्यामुळे त्याला परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता, याचिकादारातर्फे अॅड. दत्तप्रसाद लवंदे यांनी बाजू मांडून शरीरशास्त्र थिअरीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त हजेरी असल्याची, तर प्रॅक्टिकलमध्येच कमी हजेरी असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यामुळे त्याला परीक्षेस बसण्यास मोकळीक मिळावी अशी मागणी केली. याला प्रतिवादींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. 

या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर परीक्षा १२ आणि १३ ऑगस्ट  रोजी होत असल्याची दखल घेत परीक्षेस बसण्यास मोकळीक दिली. तसेच संबंधित विषयाच्या परीक्षेचा निकाल बंद लिफाफात ठेवण्याचा आदेश जारी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान अश्याच पद्धतीने आणखीन एका विद्यार्थ्याला अनाटॉमी विषयात ८ आणि ९ रोजी होणारी परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यालाही न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. 

हेही वाचा