लोटली ग्रामसभा : सनबर्न, कचरा प्रकल्पाला विरोध, रोमीला पाठिंबा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th August, 12:44 pm
लोटली ग्रामसभा : सनबर्न, कचरा प्रकल्पाला विरोध, रोमीला पाठिंबा

मडगाव : दक्षिण गोव्यातील वेर्णा पठारावर सनबर्न आयोजनासाठी अधिकारी पाहणीसाठी आलेले असताना स्थानिकांनी त्यांना जाब विचारला होता. या अनुषंगाने आज लोटली येथे खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सनबर्नला लोटली परिसरात विरोध असल्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय कचरा प्रक्रिया प्रकल्पालाही नकार देण्यात आला तर रोमी कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी करण्यात आली.

 लोटलीतील नागरिकांनी सनबर्नच्या विषयावर चर्चा करण्यासाठी खास ग्रामसभेची मागणी केलेली होती, त्यानुसार रविवारी पंचायतीच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत सनबर्नला नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवला. सनबर्न फेस्टिवलला दक्षिण गोव्यातील विविध भागातून विरोध होत असताना किटल येथील जागेला आयडीसीकडून नकार मिळाल्यानंतर वेर्णा पठारावर पाहणी करण्यात येत होती. पाहणी केली जात असताना आयडीसीच्या अधिकार्‍यांसह बुक माय शोच्या कर्मचार्‍यांना लोटलीतील जागरुक नागरिकांनी विचारणा केली होती पण त्यांना त्याची योग्य उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे या संदर्भात ग्रामसभेत चर्चा करुन नागरिकांनी सर्वानुमते गावातील कोणत्याही जागेत सनबर्न फेस्टिवलला परवानगी देऊ नये, आणि परवानगी दिल्यास नागरिकांचा विरोध असेल, असा ठराव संमत केला. सनबर्नला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामसभा होणार्‍या हॉलच्या बाहेरही गोव्याची संस्कृती वाचवा, ड्रग्ज संस्कृती गोव्यात नकोच, सनबर्न गोव्यात नको, अशा आशयाचे फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले होते.

कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध

वेर्णा येथील पठारावर होऊ घातलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पालाही लोटली ग्रामसभेत विरोध दर्शवण्यात आलेला आहे. वेर्णात औद्योगिक वसाहतीमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे आधीच लोटलीसह आजूबाजूच्या गावातील लोकांना त्रास होत आहे. यातच आता आणखी कचरा प्रकल्प येऊ न देण्याची मागणी नागरिकांनी केली. प्रत्येक गावागावात छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आल्यास कचरा प्रश्न मार्गी लागेल असेही सांगण्यात आले. सासष्टीतील ३२ गावे, कुंकळ्ळी, मडगाव व मुरगाव पालिकेतील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी वेर्णा येथे प्रक्रिया प्रकल्प येणार होता, त्याला दोन वर्षांपूर्वीही विरोध करण्यात आला होता. आता हाच प्रकल्प पुन्हा येणार असल्याचे समजल्याने नागरिकांनी पुन्हा विरोधात ठराव घेतलेला आहे.

रोमी कोकणीला मागे पडू देऊ नका

राज्यात देवनागरी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळालेला असताना रोमी कोकणी मागे पडलेली आहे. अनेक मासिक, प्रार्थना, तियात्र, मांडे व इतर साहित्य रोमी लिपीतून लिहिण्यात येत आहे. त्यामुळे रोमी कोकणी लिपीलाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा याबाबतचा ठराव लोटलीतील ग्रामसभेत घेण्यात आला.

हेही वाचा