पणजी : गोव्यात स्थायीक झालेल्या कर्नाटकातील नागरिकांच्या मागणीनंतर गोव्यात सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी कर्नाटक सरकारने जाहिरात प्रसिद्ध करत वेर्णा किंवा वास्को परिसरात इच्छूक जमीन मालकांकडून १० हजार चौरस मीटर जमीन मागीतली आहे.
सदर जाहिरात ही कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असून, यात दिलेल्या ईमेल किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इच्छुक जागा मालक तसेच बिल्डर्सनी संपर्क साधावा असे म्हटले आहे.
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार; इच्छुक जागा मालक तसेच बिल्डर्सनी संबंधित जागेची संपूर्ण माहिती, जीपीएस फोटोसह पाठवणे अपेक्षित आहे. तसेच जागेचा कोणताही न्यायप्रविष्ट वाद नसावा असेही म्हटले आहे. त्याचबरोबर, रस्त्यापासून उत्तम कनेक्टिव्हिटी असावी तसेच सदर जागा सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी योग्य असावी; असेही यात म्हटले आहे.
इच्छुक जागा मालक तसेच बिल्डर्सनी आवश्यक कागदपत्रांसह जाहिरातीत दिलेल्या प्राधिकरणाच्या बंगळुरुतील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बातमी अपडेट होत आहे.