बांग्लादेशला लागून असलेल्या ५ राज्यांच्या सीमेवर बीएसएफद्वारे थ्री लेयर सिक्युरिटी चेक पोस्टची उभारणी;होणारी घुसखोरी रोखण्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल
आयझॉल : बांगलादेशातील सत्तापालटानंतर बांगलादेशातून निर्वासितांचा सीमावर्ती राज्यांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीमा सुरक्षा दलाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत तसेच थ्री लेयर सिक्युरिटी चेक पोस्टची उभारणी व सुरक्षेशी निगडीत ८ पॉइंटर्सची काटेकोरपणे अमलबजावणी या सारख्या विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
मेघालयमध्ये बांगलादेश सीमेपासून ४ किलोमीटरच्या परिसरात हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशला लागून असलेल्या ४४३ किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेपैकी सुमारे ८० किमी सीमा ही मेघालयशी जोडून आहे. सीमा सुरक्षा दलाचे जवान येथे ४ किलोमीटरपर्यंतच्या परिघात तैनात असतात. बांगलादेशमधील घडामोडीनंतर बीएसएफचे जवान सीमा भागांतून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांवर लक्ष ठेवून आहेत. सध्या बांगलादेशातून येणाऱ्या लोकांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मिझोरामची राजधानी आयझॉलपासून २७३ किमी लांबीची लंगतलाई सीमा पूर्णपणे निर्जन आहे. राज्य सरकारने सीमेवरील ३ किलोमीटर परीघाच्या परिसरात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ही बंदी पुढील २ महिने कायम राहणार आहे. बांगलादेश सीमेवरून प्रवेश आणि बाहेर जाण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा भाग बांगलादेशच्या चितगाव आणि बंदरवनला जोडलेला आहे. डोंगरावरून पायी चालत येत बांगलादेशी नागरिक घुसखोरी करतात. रोहिंग्या देखील येथूनच घुसखोरी करतात. बांगलादेशला लागून असलेल्या जवळपास ३१८ किलोमीटर परिसरात घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे जवान पूर्णपणे प्रयत्नरत आहेत.
दरम्यान आसाममधील कछार येथील नाथनपूर बॉर्डर पोस्टजवळून वाहणाऱ्या नदीच्या तब्बल १२८ किमी परिसरात बीएसएफ बोटींच्या माध्यमातून गस्त घालत आहे. हा भाग ड्रग्सच्या तस्करीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी गेल्या ४ दिवसांपासून अनेक बांगलादेशी येतात पण बीएसएफचा कडक बंदोबस्त पाहून आल्या पावली परत निघून जातात. याठिकाणी मागे अनेक भूसुरुंग आढळून आले होते व बीएसएफने ते तत्काळ बुजवूनदेखील टाकले. सध्या करीमगंज, कछार, धुबरी आणि दक्षिण शालामारा, मानकाचरमध्ये हाय अलर्ट आहे. आसाम व बांगलादेशदरम्यान तब्बल २६८ किमीची सीमा असून तेथे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
त्रिपुरा येथे देखील बीएसएफने कडक बंदोबस्त ठेवला असून, येथे थ्री लेयर सिक्युरिटी चेक पोस्टची उभारणी करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे मेडिकल व्हिसा आहे त्यांनाच प्रवेश मिळत आहे. कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि पडताळणी अधिक कडक करण्यात आली आहे. बीएसएफ आणि इमिग्रेशन अधिकारी तीन टप्प्यांत सुरक्षेच्या एकूण आठ पॉइंटर्सवर लक्ष केंद्रित करत तपास करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये स्थिती जरा किचकट आहे. सर्वाधिक घुसखोरी येथूनच केली जाते. बांगलादेश सीमेलागत असलेल्या जलपाईगूडीच्या फुलबारी-हल्दीबारी गावात बीएसएफने तळ बनवला असून सीमेपासून ४ किमीच्या हद्दीत येण्यास मज्जाव केला जात आहे. मात्र येथे देखील थ्री लेयर सिक्युरिटीचेक पोस्टची उभारणी केली आहे. ट्रकद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरूच आहे. येथे प्रत्येक ५० मीटरवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. ते कोणालाही येऊ देत नाहीत. दररोज ५०-६० बांगलादेशी सीमेनजीकच्या क्षेत्रात येऊन भारतात येऊ देण्यासाठी विणवण्या करतात, पण बीएसएफसमोर त्याचे काहीच चालत नाही. दरम्यान येथे १०९ किमी परिसरात कुंपण नाही त्यामुळे सर्वाधिक घुसखोरी येथूनच होते. गुरुवारी देखील येथे हजारो लोक जमले होते. बीएसएफने त्यांना पांगवले. सध्या येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात येत्या काळात शांतता स्थापन झाली नाही तर, ही परिस्थिती उग्र स्वरूप धारण करू शकते