वॉशिंग्टन : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर यांच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर केवळ आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून परतणार होते. पण गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही अंतराळात अडकले आहेत. नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्यम्स आणि विल्मोर यांना परतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या फेब्रुवारी २०२५ मध्येच त्यांच्या परतीचा मार्ग सुखकर होऊ शकतो.
नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; बोईंग स्टारलाइनरच्या तंत्रात अजून सुधारणा करण्याची गरज असून यामधून त्यांना परत आणणे शक्य नाही, त्यामुळे आता इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान ५ जून रोजी बोईंग स्टारलाइनरमधून २४ तासांचा प्रवास करत अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले होते. या प्रवासादरम्यान अंतराळ यानात अनेक तांत्रिक बिघाड उद्भवले. निरीक्षण केल्यानंतर यानात लावण्यात आलेल्या एकूण २८ थ्रस्टर्स पेकी किमान ५ थ्रस्टर्स निकामी झाल्याचे तसेच ४ ठिकाणाहून हेलियमची गळती झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच एकूणच स्थिती पाहता या अंतराळयानाची दुरुस्ती करण्यासाठी लागणारी साधने देखील आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये सद्यघडीस मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
यावर तोडगा म्हणून नासाने इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची मदत घेण्याचे ठरवले आहे. स्पेस एक्सच्या पुढील मोहिमेचे उड्डाण १८ ऑगस्ट रोजी करण्याची योजना होती जी आता २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता स्पेसएक्स २ जणांना मिशन क्रू-९ मोहिमेवर ड्रॅगन कॅप्सुलद्वारे अंतराळात पाठवणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बोईंगच्या स्टीम्युलस टीमने स्टारलाईनरच्या २८ पैकी २७ थ्रस्टर्सची पूर्णतः दुरुस्ती केली असली तरीही नासाला कोणताही धोका पत्करायचा नाही. म्हणूनच अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर आता स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परततील अशी आशा नासाद्वारे व्यक्त केली जात आहे.