बगदाद : इराकी संसदेत काल ९ ऑगस्ट रोजी मुलींचे लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करण्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडण्यात आले. हे विधेयक चर्चेला येताच संसदेत संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळतात संपूर्ण इराकमध्ये लोकांनी आपापल्या परीने विरोध करायला सुरुवात केली.
समोर आलेल्या माहितीनुसार; इराकच्या शिया इस्लामी विचारसणीच्या पक्षांना 'वैयक्तिक कायद्या'त सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय कमी करायचे आहे. त्यांनी शरिया कायद्याचा हवाला देत लग्नाचे वय १८ वरून ९ वर्षे करण्यासाठी तत्काळ पाऊले उचलावीत असे म्हटले आहे. मात्र महिला हक्क संघटनांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. हे विधेयक मंजूर झाल्यास वारसाहक्क, घटस्फोट आणि मुलांचा ताबा यांसारख्या अधिकारांमध्ये मोठी कपात होईल, अशी भीती या विधेयकाला विरोध करणाऱ्या लोकांना वाटते. हे विधेयक मंजूर झाल्यास ९ वर्षांच्या मुलींना १५ वर्षांच्या मुलांशी लग्न करण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र असे केल्याने याचा विपरीत परिणाम होईल व देशात बालविवाह आणि शोषणाची अधिक प्रकरणे समोर येतील.
या विधेयकाला विरोध करणाऱ्या संघटनेनुसार, हे विधेयक मंजूर झाल्यास महिलांच्या हक्कांची गळचेपी होईल. शिवाय त्यामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणाच्या गंभीर समस्या निर्माण होतील. मानवाधिकार संघटनांच्या महिलांनी असाही युक्तिवाद केला की लवकर विवाहामुळे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल तसेच अकाली गर्भधारणेची समस्या देखील उद्भवू शकते. त्याच बरोबर घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होईल. एकंदरीत कट्टरवादी विचारसणीचा ऊहापोह करणाऱ्या परंपरावाद्यांचा हा निर्णय देशातील तरुणपिढीला रुचलेला नाही. यावरुन आगामी काळात देशात अराजक माजण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.