सौदी अरेबियात खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य

Story: विश्वरंग |
09th August 2024, 11:09 pm
सौदी अरेबियात खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य

भारतीय लोक मोठ्या प्रमाणात सौदी अरबमध्ये नोकरीसाठी जात असतात. साऊथकडील केरळसारख्या राज्यातील अनेक तरुण-तरुणी नोकरीसाठी सौदी अरेबियाला प्राधान्य देत असतात. परंतु, आता सौदीला नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांवर मोठा परिणाम होईल, असा निर्णय सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला आहे. सौदी अरेबियात गेल्या महिन्यापासून कुटुंब कर लागू झाल्यामुळे सौदी अरेबियाने खासगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकऱ्यांमध्ये आपल्या लोकांना म्हणजेच भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खासगी क्षेत्रातील इंजिनिअरिंगच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक नागरिकांना आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नागरिकांसाठी नोकरीत आता २५ टक्के आरक्षण लागू केले आहे. स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामागे सौदी अरेबियातील नागरिकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी देण्याचा उद्देश आहे. पण, याचा परिणाम सौदी अरेबियात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या भारतीयांवर होऊ शकतो.

मनुष्यबळ आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत अभियांत्रिकी क्षेत्रातील सौदी अरेबियातील नागरिकांची संख्या वाढेल, असा विश्वास आहे. 

सौदी अरेबियाची अधिकृत प्रेस एजन्सी सौदी प्रेस एजन्सीने सांगितले आहे की, मंत्रालयाने नगरपालिका, ग्रामीण व्यवहार आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या सहकार्याने अभियांत्रिकी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के स्थानिकांना कोटा लागू केला आहे. या नवीन धोरणामुळे सौदीतील तरुण आणि तरुणींना अधिक चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. ज्या खासगी कंपनीत पाच किंवा पाचहून जास्त कर्मचारी काम करीत असतील, त्या प्रत्येक कंपनीला या आरक्षणाची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या कंपन्या या नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सौदी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'व्हिजन २०३०' अंतर्गत सौदी अरेबियाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल करत आहेत. त्याचाच भाग म्हणून सौदी अरेबियाच्या विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये सौदी नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. व्हिजन २०३० अंतर्गत, सौदीतील बेरोजगारी ७ टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये विविधता आणून कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी करायचे 

आहे.

सौदी अरेबियाचा प्रायव्हेट इंजिनिअरिंग सेक्टरमधील आरक्षणाचा निर्णय अनेक भारतीयांवर प्रभाव पाडेल. याचे कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नोकरीच्या शोधात सौदी अरेबियात जातात. नोकरीच्या शोधात जाणाऱ्यांमध्ये कौशल्य आणि निमकौशल्य कामगारांचा समावेश असतो ज्यात इंजिनिअर्सही असतात. २०२२ मध्ये सौदी अरेबियाने म्हटले की, नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांची संख्या ५ पटीने वाढली आहे. २०२२ मध्ये १,७८,६३० भारतीय नोकरीसाठी सौदीला गेले होते. आता सौदीने आपल्या नागरिकांसाठी खासगी अभियांत्रिकी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे, ज्यामुळे भारतीयांना या क्षेत्रातील संधी कमी होतील.

- सुदेश दळवी