बिग बॉसच्या घरात मूळ गोमंतकीय व मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकरांची एंट्री. ''कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर देणार टक्कर
मुंबई : मराठी मनोरंजन क्षेत्र कात टाकतेय. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक सृजनशील प्रयोह केले जाताहेत. मराठी नाटक हे आधीपासूनच प्रयोगशाळेचे रूप घेऊन वावरत होतेच आता नव्या दमाचे दिग्दर्शक-टेक्निशियन्स-अभिनेते-पटकथा लेखकही नव्या कन्सेप्ट घेऊन येत आहेत. आता मराठी मनोरंजन विश्वात सर्वत्र चर्चा आहे ती मराठी बिग बॉस या 'रिअलिटी शो'ची. यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करतोय आपला लाडका सुपरस्टार अभिनेता रीतेश देशमुख. आणि यात सहभागी झालेले स्पर्धक देखील तीतकेच लय भारी आहेत.
यावेळी, बिग बॉसच्या घरात धमाकेदार अशा १६ स्पर्धकांची भट्टी जमली आहे. यात आपले आवडते कलाकार, कंटेंट क्रिएटर्स यांची जुगलबंदी पाहायला मिळेल. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घराची झलकही प्रेक्षकांनी पाहिली. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी ५ च्या पहिल्या स्पर्धक मूळ गोमंतकीय आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर घरात आल्या आहेत. त्याच बरोबर सोशल मिडियावर आपल्या अतरंगी ढंगात शॉर्ट व्हीडिओज आणि कंटेंट बनवणारी देवबाग येथील 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकरची देखील घरात एंट्री झाली आहे.
त्यानंतर घरात निखिल दामले या तरुण व उमद्या अभिनेत्याने घरात प्रवेश केला. रमा राधव या गाजलेल्या मालिकेतील निखिलचे काम चांगलेच भाव खाऊन गेले होते. एके काळी यूट्यूबर्स विरुद्ध टिकटॉकर्स यांच्यातील वादाने मनोरंजनाची परिसीमा गाठली होती. विविध ब्रॅंड आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग-प्रोमोशन करण्यासाठी अभिनेते-अभिनेत्रींपेक्षा इन्फ्लुएन्सर-कंटेंट क्रिएटर्सना जास्त महत्त्व देतात. इन्फ्लुएन्सरला महत्व मिळाल्यावर अनेकदा कलाकारांनी यावर आक्षेप घेतला आहे. अजूनही अभिनेते आणि क्रिएटर्स यांच्यात शीत युद्ध सुरूच आहे. याच शीतयुद्धाचा भडका उडून यावेळी बिग बॉसच्या घरात राडा होणार अशी चिन्हे पहिल्याच एपिसोड मध्ये दिसून आलीत. निखिल आणि अंकिता यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे पहायला मिळाले.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घनश्याम दराडे यांचा समावेश आहे आता घरात आर्या जाधव हिच्यासह वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. ग्रँड प्रीमियरलाच कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने बिग बॉसच्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे
यंदा बिग बॉस मध्येएक महत्त्वाचा बदल झालाय. येथे आता काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतले तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही. काही महत्त्वाच्या नियमांचा उलगडा येत्या भागांत केला जाण्याची शक्यता आहे,
सासू सुनेची रोजची भांडणे, एकाच पठडीतल्या रटाळ मालिका, बातम्या यास पर्याय काय ? याचा जेव्हा मनोरंजन क्षेत्रातील तज्जांनी अभ्यास केला तेव्हा भारतात 'रिअलिटी शो'चा जन्म झाला. 'रिअलिटी शो ही कन्सेप्ट पाश्चात्य देशांत एव्हाना भलतीच लोकप्रिय झालेली. भारतात 'रिअलिटी शो' भोवती एक वेगळेच असे आकर्षणाचे वलय आहे. अंताक्षरी, रोडीज, स्टंट-मेनिया, स्प्लिट्सव्हिला, कौन बनेगा करोडपती, दस का दम, डान्स इंडिया डान्स इंडियन आयडल.. ही यादी खूप मोठी आहे.
याच यादीत मानाचे स्थान आहे ते 'बिग बॉस'ला. हिंदीत बिग बॉस ला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांची वाढती क्रेझ पाहता, प्रादेशिक भाषांत देखील हा प्रयोग करण्यात आला.अपेक्षेप्रमाणे तोही चालला. मराठी बिग बॉस चे आतापर्यंत ४ सीजन येऊन गेलेत. यांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता रीतेश देशमुख सारखा चॉकलेट बॉय ती जबाबदारी पेलू शकतो का ? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार, पण त्याही पेक्षा स्पर्धकांची एकमेकांशी कशी आणि कोणत्या पातळीवर स्पर्धा रंगणार हे पाहणे अधिक मनोरंजक असेल.