निर्णयामुळे २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा
नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेची मागणी फेटाळून लावली असून, फेरपरीक्षेचे मोठे परिणाम होतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२३ जुलै) निकाल देताना सांगितले की, नीट परीक्षा पुन्हा होणार नाही. निर्णय वाचताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, केंद्र सरकार आणि एनटीएने त्यांचे म्हणणे मांडले. सीबीआयच्या अतिरिक्त संचालकांनीही न्यायालयाला सहकार्य केले. सरन्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्यामुळे आम्ही फेरपरीक्षा योग्य मानत नाही.
पेपर लीक हा हजारीबागमध्ये झाला आणि पाटणापर्यंत गेला हा आमचा निष्कर्ष निर्विवाद आहे. आदेशाचे वाचन करताना सरन्यायाधीश म्हणाले, सीबीआयने आतापर्यंत हजारीबाग आणि पाटणा येथील १५५ विद्यार्थी लाभार्थी म्हणून समोर आल्याचे सांगितले आहे.
परीक्षेचे पावित्र्य पूर्णपणे बाधित नाही!
तपास अद्याप अपूर्ण आहे. ४७५० केंद्रांपैकी कुठे अनियमितता आहे, याचे उत्तरही आम्ही केंद्राकडे मागवले होते, असे सरन्यायाधीश म्हणाले. आयआयटी मद्रासनेही या प्रकरणाचा आढावा घेतला. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे परीक्षेच्या पावित्र्याला पूर्णपणे बाधा आल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.
फेरपरीक्षेचा विद्यार्थ्यांवर परिणाम होईल!
आम्ही या वर्षीच्या निकालाची गेल्या ३ वर्षांच्या आकडेवारीशी तुलना केली. यातूनही व्यापक अशांतता दिसून आली नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले. चुकीच्या पद्धतींचा अवलंब करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याने भविष्यात लाभ घेऊ नये किंवा प्रवेश देऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. आम्हाला विश्वास आहे की फेरपरीक्षेचा २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होईल. शैक्षणिक सत्र विस्कळीत होईल व अभ्यासाला उशीर होईल. त्यामुळे आम्ही फेर परीक्षा योग्य मानत नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणाले.
फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकांची मालिका
परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संशयावरून देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिकांची मालिका सुरू झाली. यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकाच वेळी सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. या सुनावणीत बिहार पेपरफुटीपासून हजारीबाग, सीकर आणि गोध्रा प्रकरणांचा तपास, एका प्रश्नाची दोन उत्तरे, सीबीआय तपास आदी सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व बाजूंवरील वादविवाद ऐकल्यानंतर निर्णय दिला की, यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल, कारण विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ताटकळत ठेवता येणार नाही. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे.