वाळपई : भिंरोडा पंचायत क्षेत्रातील वांते गावकरवाडा येथील रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. यामुळे नागरिकांना बऱ्याच प्रमाणात त्रास सहन करावे लागले. वाळपई अग्निशामक दलाचे जवान, स्थानिक नागरिक व पंच सदस्यांच्या सहकार्यातून सदर झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्व पदावर आली .
माहितीनुसार भिंरोडा पंचायत शेतातील वांते डोंगरवारवाडा या ठिकाणी सकाळी वादळी वाऱ्याचा फटका बसून झाड रस्त्यावर पडले .यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन झाड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी स्थानिक पंच सभासद भिरोंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांची उपस्थिती होती.
नागरिकांनी सदर झाड हटविण्यासाठी अग्निशामक दलाच्या यंत्रणेला मदत केल्याबद्दल उदयसिंग राणे यांनी सर्व नागरिकांचे व अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे .यामुळे मोठ्याप्रमाणात घरांचे नुकसान होणे, रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प होणे, विजेचा प्रश्न या सारख्या तत्सम समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे.
यामुळे सद्यघडीला वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणात दमछाक होताना दिसत आहे.सदर घटनेमुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरून झाड हटविल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली .दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानलेले आहेत.