आज प्रेक्षकांना मिळणार ‘बॅड न्यूज’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th July, 12:04 am
आज प्रेक्षकांना मिळणार ‘बॅड न्यूज’


आज थिएटर्स आणि ओटीटीवर कॉमेडी, अॅक्शन, थ्रिलर, हाॅरर चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. ​यामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी स्टारर बॅड न्यूज, पृथ्वीराज सुकुमारन यांचा बहुचर्चित चित्रपट 'आदुजीविथम: द गोट लाइफ', कोरियन थ्रिलर स्वीट होम सीझन ३, एक रोमांचक माहितीपट स्कायवॉकर्स: अ लव्ह स्टोरी, साय-फाय थ्रिलर आय.एस.एस., एक रोमँटिक चित्रपट फाईंड मी फॉलिंग आणि बरेच चित्रपट पहायला मिळणार आहेत.


बॅड न्यूज (थिएटर्स)
आनंद तिवारी दिग्दर्शित बॅड न्यूज चित्रपट एका तरुणीभोवती फिरतो. जिला जुळ्या मुलांची गर्भधारणा होते. परंतु हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन नावाची दुर्मिळ वैद्यकीय स्थिती असते जिथे दोन मुलांचा डीएनए दोन भिन्न पुरुषांचा असतो. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट गुड न्यूज चित्रपटाचा सिक्वल आहे.


'आदुजीविथम: द गोट लाइफ' (नेटफ्लिक्स)
पृथ्वीराज सुकुमारन यांचा बहुचर्चित चित्रपट 'आदुजीविथम: द गोट लाइफ' आज प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवरून प्रेरित आहे. सौदी अरेबियात नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडलेल्या नजीब नावाच्या मल्याळी स्थलांतरित मजुराचा त्रासदायक प्रवास आपल्याला पहावयास मिळणार आहे. सुरुवातीला चांगल्या भविष्याची आशा बाळगून, सौदी अरेबियामध्ये गेल्यावर शोषण आणि क्रूरतेच्या जाळ्यात अडकलेल्या नजीबच्या स्वप्नांचा चुराडा होतो. शेळीपालक म्हणून गुलामगिरीत त्याला जीवन जगावे लागते. या चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा अभिनय प्रेक्षकांना थक्क करून टाकतो.


लेडी इन द लेक (अॅपल टीव्ही)
‘लेडी इन द लेक’ ही​ मालिका जे लॉरा लिपमन यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. मालिकेमध्ये १९६० च्या दशकातील बाल्टिमोर शहरात घडलेली कथा दाखविण्यात आली आहे. एक शोध पत्रकार महिला पत्रकार म्हणून करिअर करण्यासाठी आपले लग्न आणि विलासी जीवन सोडून देण्याचा निर्णय घेते. कथानक जसजसे पुढे सरकत जाते, तसतसे ती खुनाच्या दोन वेगळ्या प्रकरणांचा आपल्या परीने छडा लावण्याचा प्रयत्न करत जाते. यामध्ये एक ११ वर्षांच्या मुलीचा आणि दुसरा बारटेंडरच्या खूनाच्या घटनांचा समावेश आहे.


स्कायवॉकर्स: अ लव्हस्टोरी (नेटफ्लिक्स)
हा रोमांचक माहितीपट अँजेला निकोलाऊ आणि इव्हान बीर्कस दाम्पत्याच्या वास्तविक जीवनावर आधारीत आहे. जे जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारतवर स्केलिंग करून त्यांच्या प्रेमाच्या मर्यादा तपासण्याचा प्रयत्न करतात.


नागेंद्रज हनीमून (डिस्ने + हॉटस्टार)
ही एक मल्याळम मालिका आहे. जी नागेंद्रन नावाच्या आळशी माणसाच्या (सूरज वेंजारामूडूने भूमिका केली आहे) सभोवताली फिरते. जो हुंडा मिळवण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि समुद्र किनाऱ्यांवर जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण करतो. जेव्हा तो पाच स्त्रियांशी लग्न करतो तेव्हा कथानकाला कॉमिक ट्विस्ट येतो.


स्वीट होम सीझन ३ (नेटफ्लिक्स)
स्वीट होमचा नवीन सिजन ह्यून-सू नावाच्या हायस्कूल सोडलेल्या विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारीत आहे. या कोरियन अपोकॅलिप्टिक हॉरर ड्रामामध्ये सॉन्ग कांग, ली जिन-वूक आणि ली यूजीन यांच्या प्रमुख भूमिका आहे.

आय.एस.एस. (जीओ सिनेमा)
आय.एस.एस. ही मालिका यूएस आणि रशियन अंतराळवीरांच्या जीवनावर आधारीत आहे. पृथ्वीवर युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या वरिष्ठांच्या आदेशावरून स्पेसशिप ताब्यात घेण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहतात.


फाइंड मी फॉलिंग (नेटफ्लिक्स)
ही एका रॉकस्टारची कथा आहे. ज्याचा अल्बम अयशस्वी झाल्यानंतर, तो आपला वेळ घालवण्यासाठी भूमध्य बेटावर जाण्याचा निर्णय घेतो. तथापि, जेव्हा तो तेथे पोहोचतो तेव्हा त्याच्या जीवनात उलथापालथ होते. या रोमँटिक चित्रपटात हॅरी कॉनिक जूनियर, अग्नी स्कॉट आणि अली फुमिको व्हिटनी प्रमुख भूमिकेत आहेत.


इमॅक्यूलेट (थिएटर्स)
सिडनी स्वीनी द्वारे दिग्दर्शीत हा भयपट चित्रपट एका अमेरिकन ननची कथा सांगतो. जी इटलीमधील एका रिमोट कॉन्व्हेंटमध्ये जाण्याचा निर्णय घेते. तथापि, जेव्हा तिला रिमोट कॉन्व्हेंटमधील काही रहस्यांबद्दल कळते तेव्हा तिचे जीवन वेगळे वळण घेते.


आर्केडियन (लायन्सगेट प्ले)
हॉलीवूड अभिनेता निकोलस केज अभिनीत, हा ॲक्शन हॉररपट पॉल नावाच्या व्यक्तीभोवती केंद्रित आहे. जो त्याची जुळी मुले, जोसेफ आणि थॉमससह एका फार्महाऊसमध्ये राहतो. परंतु एका रात्री एक अनपेक्षित घटना घडते आणि त्या तिघांचे आयुष्य बदलून टाकले. त्यानंतर घडणाऱ्या घटना तुम्हाला जाग्यावर खिळवून ठेवतील.