श्रीलंका दौऱ्यासाठी विराट-रोहितला आराम

कर्णधारपदी हार्दिक-राहुलच्या नावाची चर्चा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th July, 12:43 am
श्रीलंका दौऱ्यासाठी विराट-रोहितला आराम

बंगळुरू : टीम इंडिया जुलै महिनाअखेर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. २७ जुलै ते ७ ऑगस्ट, या दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना बीसीसीआयकडून आराम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचा भार कुणाच्या खांद्यावर असणार? याबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या दोन नावाची कर्णधारपदासाठी चर्चा सुरू आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात टीम इंडियाची पहिली मालिका असणार आहे. यामध्ये नेतृत्व कुणाकडे असेल. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे कर्णधार?
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात केएल राहुलला संधी मिळाली नव्हती. पण आता श्रीलंका दौऱ्यात केएल राहुलकडे संघाची धुरा असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टी-२० क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यामुळे हार्दिक पांड्याला टी-२० संघाचे नेतृत्व मिळू शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
राहुलकडे वनडेच्या कर्णधारपदाची धुरा ?
केएल राहुल वनडेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे बीसीसीआयकडून वनडेच्या कर्णधारपदाची धुरा केएलच्या खांद्यावर सोपवली जाईल. केएल राहुलने ७५ वनडे सामन्यात ५०.३५ च्या सरासरीने २८२० धावा केल्या आहेत. त्यामध्ये सात शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. श्रीलंका दौऱ्यात वनडे संघाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याचे समोर येत आहे.