किताबी लढतीत अॅरोनचा चंदनशी, प्रज्ञाचा इशिताशी सामना

नागेश-सुशिला वेर्णेकर स्मृती मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th July, 09:46 pm
किताबी लढतीत अॅरोनचा चंदनशी, प्रज्ञाचा इशिताशी सामना

पणजी : नागेश-सुशिला वेर्णेकर स्मृती मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अॅरोनचा सामना चंदनशी तर प्रज्ञाचा सामना इशिताशी होणार आहे. स्पर्धेचे आयोजन चांदोर क्लबने गोवा टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने चांदोर येथे केले आहे.

चौथ्या अखिल गोवा नागेश - सुशीला वेर्णेकर स्मृती मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या रोमहर्षक सामन्यामध्ये अव्वल मानांकित अॅरोन फरियासचा सामना १९ वर्षांखालील मुलांच्या फायनलमध्ये द्वितीय मानांकित चंदन कारोशी होईल तर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत प्रज्ञा कारोचा सामना इशिता कुलासोशी होईल.

चंदन आधीच १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत पोहोचला असून तो तिहेरी किताबाच्या शर्यतीत आहे. त्याचप्रमाणे इशिता आणि प्रज्ञा या दोघी दुहेरी किताबासाठी स्पर्धा करत आहेत. इशिता यापूर्वी १३ वर्षांखालील अंतिम फेरीत पोहोचली होती आणि प्रज्ञा १५ वर्षांखालील विजेतेपदासाठी स्पर्धा करत आहे.

१९ वर्षांखालील मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञा कारोने मारुष्का डी'कोस्टाचा ३-० असा पराभव केला, अनुश्री नाईकने रोया गोपीवर ३-१, इशिता कुलासोने उर्वी सुर्लकरवर ३-१ आणि नीझा कामतने सनिशा सिन्हावर ३-१ अशी मात केली. उपांत्य फेरीत प्रज्ञा कारोने अनुश्री नाईकचा ३-० आणि इशिता कुलासोने नीझा कामतचा ३-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

१९ वर्षांखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत अॅरोन फारियासने पुष्कर विर्गिणकरवर ३-०, रिशन शेखने अथर्व धुळपकरवर ३-०, खुशाल नाईकने रुहान शेखवर ३-० आणि चंदन कारोने सुरेंद्र चुबेवर ३-० अशी मात केली. उपांत्य फेरीत अॅरोन फारियासने रिशन शेखचा ३-१ असा आणि चंदन कारोने खुशाल नाईकचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.