‘पीएम दिव्यांश’द्वारे राज्यातील ६२१ दिव्यांगांना ८४ लाखांची मदत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th June, 12:46 am
‘पीएम दिव्यांश’द्वारे राज्यातील ६२१ दिव्यांगांना ८४ लाखांची मदत

पणजी : प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र (पीएमडीके) उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ३४३ पुरुष आणि २७८ महिला अशा एकूण ६२१ दिव्यांग व्यक्तींना ८४ लाख ६४ हजार ३१२ रुपये किमतीची विविध सहाय्यक उपकरणे, साधनांचे वितरण करण्यात आले आहे. तर एकूण १०४४ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे सहाय्य करण्यात आले आहे. राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी ही माहिती दिली आहे.
पावसकर यांनी सांगितले की, राज्यात झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२४’मध्ये राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय तसेच गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय यांच्याद्वारे गोमेकॉ येथे पीएमडीके सुरू करण्यात आले होते. याद्वारे केंद्र शासनाच्या दोन योजनांतर्गत दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सहाय्यक उपकरणे तसेच साधनांचे वाटप केले जाते.
या उपक्रमास गोव्यातील दिव्यांग व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन्मानपूर्ण व स्वतंत्रपणे जीवन जगता यावे, यासाठी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आवश्यक साधने आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे. दिव्यांगजनांसाठी अत्यावश्यक अशी सहाय्यक उपकरणे वितरित करून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात लक्षणीय सुधारणा केली जात आहे.
पावसकर म्हणाले की, पहिली ‘एडीआयपी’ योजना सर्वसमावेशक असून यामध्ये वय किंवा खर्चाचे कोणतेही बंधन नाही. यानुसार दिव्यांग व्यक्तीस मोटरचलित तिचाकी, व्हीलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, कृत्रिम हात-पाय अशा विविध प्रकारची आवश्यक साधने गरजेनुरूप उपलब्ध करून देण्यात येतात. तर राष्ट्रीय वयोश्री योजना (आरकेवाय) या दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते.

केंद्राला दररोज ३० व्यक्तींची भेट
गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या या केंद्रास दररोज सरासरी ३० व्यक्ती भेट देतात. ही सेवा राज्यातील दुर्बल घटकांसाठी उपयुक्त ठरत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार ठरत असल्याचे केंद्राचे प्रभारी असलेले डॉ. शुभम पवार यांनी सांगितले.