युवा केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंबाबत औत्सुक्य

Story: राज्यरंग |
14th June, 12:37 am
युवा केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंबाबत औत्सुक्य

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होण्यात आंध्र प्रदेशचे मोठे योगदान आहे. राज्यात भाजप, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि पवन कल्याण यांचा जन सेना पक्ष (जेएसपी) यांची युती होती. २५ मतदारसंघांपैकी टीडीपीने १६, भाजपने ३, तर जेएसपीने २ जागांवर विजय संपादन केला. ‘मोदी ३.०’ सरकारमध्ये नागरी उड्डाणमंत्री बनलेले टीडीपीचे युवा खासदार के. राममोहन नायडू यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे.

२०२१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी राममोहन यांनी पालकत्व रजेसाठी अर्ज केला होता. त्यांची पत्नी गर्भवती होती. त्यांच्या या रजेवरून संसदेत भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर लिंगभाव समानता आणि लैंगिक शिक्षण या विषयावर चर्चाही झाली होती. आता तेच नायडू सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्वांत युवा कॅबिनेट मंत्री ठरले आहेत. ते केवळ ३६ वर्षांचे आहेत. श्रीकाकुलम मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट् ट्रिक नोंदवली आहे.

राममोहन नायडू मागासवर्गीय समाजातील आहेत. त्यांचे वडील किंजारापू येरेन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर समर्थक होते. देवेगौडा आणि गुजराल मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी तेही सर्वांत युवा मंत्री होते. वडील चंद्राबाबूंचे समर्थक आणि श्रीकाकुलम मतदारसंघही टीडीपीचे वर्चस्व असलेला असल्याने राममोहन यांनी राजकारण प्रवेशासाठी हाच पक्ष आणि मतदारसंघ निवडला. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी अमेरिकेतून मिळवली. नंतर त्यांनी एमबीए पूर्ण केले. सिंगापूरमध्ये त्यांनी नोकरीही केली आहे. त्यांचे वडील येरेन नायडू राज्यातही काही काळ मंत्री होते.

येरेन नायडू यांचा २०१२ मध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी विरोधी बाकांवर असलेल्या टीडीपीला मोठा धक्का बसला. या घटनेने राममोहन यांना राजकारणात आणले. २०१४ मध्ये ते सर्वप्रथम वडिलांच्याच श्रीकाकुलम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये राज्यात जगनमोहन रेड्डींची लाट असतानाही त्यांनी विजय नोंदवला. चंद्राबाबू अडचणीत असतानाही त्यांची साथ सोडली नाही. त्याचीच परतफेड म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी चंद्राबाबूंनी त्यांचेच नाव पुढे केले.

राममोहन २०२० मध्ये ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यांनी कृषी, पशुपालन, अन्न प्रक्रिया, रेल्वे, गृह या खात्यांच्या स्थायी समित्यांवर काम केले आहे. राममोहन संसदेमध्ये विविध चर्चांमध्ये सहभागी होतात. संसदेमध्ये त्यांनी मासिक पाळीदरम्यानचे स्त्रियांचे आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणली होती. सॅनिटरी पॅडवरील जीएसटी रद्द करण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली होती. राममोहन यांनी संसदेत बोलताना ‘महिला ‘नाही’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असाच असतो’, असे ठामपणे सांगितले होते. तेव्हा विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह सर्वांनी बाके वाजवून त्यांना पाठिंबा दर्शवला होता. आता कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. त्या ते पूर्ण करतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.


- प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)