कुख्यात गुंड विशालसिंह चौहान जेरबंद

गुलबर्गा कारागृहात रवानगी : गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रात गंभीर गुन्हे नोंद

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
11th June, 05:56 pm
कुख्यात गुंड विशालसिंह चौहान जेरबंद

जोयडा : गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, सुपारी, शस्त्र कायदा उल्लंघन असे एकूण १४ गुन्हे करून पोलिसांची डोकेदुखी बनलेला कुख्यात गुंड विशालसिंह चौहान (२८) याला गुंडा कायद्यांतर्गत अटक करून त्याची गुलबर्गा कारागृहात रवानगी केली.

गुंड विशालसिंह चौहान (मूळ रा. चिक्कनंदीहळ्ळी ता कित्तूर, सध्या रा. कदम बिल्डिंग शास्त्रीनगर बेळगाव) याच्याविरुद्ध एक खून, पाच खुनाचे प्रयत्न, एक शस्त्र कायदा भंग प्रकरण, एक पैशासाठी अपहरणाचे प्रकरण, २ वेळा तडीपार आदेशाचे उल्लंघन, गोव्यात चोरीचे एक प्रकरण, महाराष्ट्रात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायदा भंगाची २ प्रकरणे अशा १४ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावरील गुन्ह्याचा विचार करता बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी त्याच्या गुन्ह्याविषयी फाईल तयार करण्यास सांगितली होती. कायदा व सुव्यवस्था शाखेचे डिसीपी रोहन जगदीश यांनी गुन्हेगाराची सर्व माहिती संग्रहित करून ही फाईल उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यानुसार न्यायालयाने विशालसिंह चौहान याच्यावर गुंडा कायदा लावण्याचा आदेश दिला. त्यानुसार विशालसिंहवर गुंडा कायद्याखाली कारवाई करीत त्याला अटक केली. त्यानंतर त्याची गुलबर्गा कारागृहात रवानगी केली आहे.

या कारवाईत गुन्हे शाखेचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी एच. शेखरप्पा, उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी यांनी सहभाग घेतला.