एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही : ममता बॅनर्जी

शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचा दावा : सोहळ्याला उपस्थिती लावणार नाही

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th June, 08:52 pm
एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही : ममता बॅनर्जी

कोलकाता : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा रविवारी (९, जून) होणार आहे. मात्र, मोदी ३.० सरकारच्या शपथविधीपूर्वी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोठा दावा केला आहे. एनडीए सरकार फार काळ टिकणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजपचे अनेक नेते काही दिवसांत पक्ष सोडू शकतात. भाजपचे अनेक नेते खूप नाराज आणि अस्वस्थ आहेत. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.

टीएमसी शपथविधीला उपस्थित राहणार नाही

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेस उपस्थित राहणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना आमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे त्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तृणमूल काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे टीएमसी प्रमुखांनी सांगितले. आम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. देशाला बदलाची गरज आहे, आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जनादेश आल्यावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होऊ नये, असे ममता म्हणाल्या. आज ‘इंडी’ आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, याचा अर्थ भविष्यात आम्ही तसे करणार नाही असे नाही असे ममता पुढे म्हणाल्या.

सीएए रद्द झालाच पाहिजे : ममता

ममता बॅनर्जी यांनी सीएएबाबत भाजपवर निशाणा साधला. सीएए रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत, असे ममता म्हणाल्या. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील, मी सर्व खासदारांना सांगेन की, पक्ष मजबूत करा. तुमचा पक्ष आम्ही तोडणार नाही, पण तुमचा पक्ष आतून फुटेल, तुमच्या पक्षात लोक खूश नाहीत, असे ममता पुढे म्हणाल्या.

बंगालमध्ये ममतांचा दबदबा कायम

तृणमूलने बंगालमध्ये आपला दबदबा कायम ठेवला असून पक्षाने राज्यातील लोकसभेच्या ४२ पैकी २९ जागा जिंकल्या आहेत. राज्यात, प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या जागांची संख्या १२ वर घसरली, तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली. टीएमसीने बंगालमधील भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव केला. त्याचवेळी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचाही टीएमसी उमेदवार माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी पराभव केला.

हेही वाचा