सर्वांत श्रीमंत उमेदवार पेम्मासानी यांचा दणदणीत विजय

गुंटूर लोकसभा मतदारसंघात तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th June, 12:59 am
सर्वांत श्रीमंत उमेदवार पेम्मासानी यांचा दणदणीत विजय

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार असलेले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे गुंटूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात ५ हजार ७०५ कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती घोषित करून ते श्रीमंत उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी होते.

भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, तेलगु देसम पार्टीचे (टीडीपी) उमेदवार पेम्मासानी यांनी ८,६४,९४८ मते मिळविली आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाचे उमेदवार किलारी वेंकट रोसैया ५२०२५३ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

पेम्मासानी (वय ४८) हे मूळचे गुंटूर जिल्ह्यातील आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी १९९९ मध्ये डॉ. एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केले. २००५ मध्ये त्यांनी पेनसिल्व्हेनिया, यूएसए मधील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून एमडी पदवी प्राप्त केली. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात काम करत असताना त्यांनी UWorld या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली जी विद्यार्थ्यांना SAT, MCAT आणि युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग परीक्षा यांसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते.

पेम्मासानी यांनी २०१४च्या निवडणुकीदरम्यान राजकीय मोहिमांमध्ये सक्रियपणे भाग घेतला. २०१९च्या निवडणुकीतही ते सक्रिय होते. पेम्मासानी यांची १०० हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यांच्या जंगम मालमत्तेत दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस कारचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे हैदराबाद, तेनाली आणि यूएसमध्ये जमीन आणि मालमत्ता आहे.

दरम्यान, उद्योगपती नवीन जिंदाल यांनी १,२३० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी काँग्रेसचे अभय सिंह चौटाला यांच्या विरोधात विजय मिळविला.

भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी विजयी

४ हजार ५६८ कोटींची मालमत्ता असलेले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातून ८ लाख ९ हजार ८८२ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. गड्डाम रजनीथ रेड्डी (६,३६९८५ मते) यांचा पराभव केला.

तिसऱ्या क्रमांकावरील पल्लवी धेंपो पराभूत

दक्षिण गोव्यातून भाजपतर्फे​ निवडणूक रिंगणात उतरलेल्या पल्लवी श्रीनिवास धेंपो तिसऱ्या क्रमांकावरील श्रीमंत उमेदवार होत्या. त्यांनी १,३६१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. मात्र काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी त्यांचा पराभव केला.

हेही वाचा