गोवा मराठी अकादमीचा साहित्य गंध कार्यक्रम रंगला

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
02nd June, 11:55 pm
गोवा मराठी अकादमीचा साहित्य गंध कार्यक्रम रंगला

गोवा मराठी अकादमीच्या साहित्य गंध कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अनिल सामंत. सोबत श्रीकांत मोरे, अरुण रायकर, रजनी रायकर, चित्रा क्षीरसागर, शर्मिला प्रभू. 

नावेली : जंगलचा राजा सिंह हा नेहमी सिंहावलोकन करत असतो. जी माणसे अशी अवलोकन मागे करतात ती पुढची दिशा नेमकी चांगल्यारीतीने चालू शकतात, असे उद्गार गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी ‘साहित्य गंध’ या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.
गोवा मराठी अकादमी सासष्टी विभाग व सासष्टी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य गंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल सामंत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्रीकांत मोरे व गोवा मराठी अकादमी सासष्टी विभागाचे अध्यक्ष अरुण रायकर यांची उपस्थिती होती.
श्रीकांत मोरे यांनी सांगितले की, खेळ हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग असून शिक्षणासोबत मैदानी खेळालाही महत्त्व द्यावयास हवे. मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक तसेच मानसिक जडणघडण ही चांगली होत असते.
‘मर्मबंधातली ठेव’ लिहून पत्रकार, कवयित्री कविता आमोणकर यांनी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. शैलीदार लेखनाचे उत्तम उदाहरण म्हणून या पुस्तकाकडे पाहता येते. सुंदर असे लालित्यपूर्ण लेखन या पुस्तकात वाचायला मिळते. या पुस्तकात ३२ लेख असून त्यात वैचारिक लेखावर उत्तम प्रकारे भाष्य करणारे लेख ही या पुस्तकात आहेत, असे प्रा. सारिका आडविलकर यांनी सांगितले.
दरम्यान, याच कार्यक्रमाअंतर्गत गोवा राज्याचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाल्याबादल मेघना कुरूंदवाडकर यांचा श्रीकांत मोरे व अनिल सामंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक व कवयित्री चित्रा क्षीरसागर यांनी केले.