वाचाळवीरांना घाला आळा

फातर्पे येथील सुप्रसिद्ध फातर्पेकरीण व शिरगाव येथील लईराईदेवीवर तोंडसुख घेणाऱ्या वाचाळवीर श्रेया धारगळकर यांच्याविरोधात गोव्यात सध्या वातावरण गरम झालेले आहे. देवीदेवतांवर अपमानकारक टिप्पणी करणाऱ्या व भाविकांच्या भावना दुखाविणाऱ्या अशा वाचाळवीरांमुळे गोव्यात कार्यरत असलेल्या अनेक एनजीओंच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वाचाळवीरांच्या तोंडाला कायमची टेप लावणारा हा प्रयत्न खरोखरच स्वागतार्ह आहे.

Story: भवताल |
26th May, 05:29 am
वाचाळवीरांना घाला आळा

एखादी बिगर सरकारी संस्था स्थापन करून वैयक्तिक, सामाजिक, वैचारिक, पर्यावरणीय, शैक्षणिक, धार्मिक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर समाजात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वी अनेक वेळा झालेले आहेत. सहजासहजी कोणी याला दाद देत नाही. मात्र जेव्हा हा वाद धार्मिक असतो, तेव्हा त्याचे पडसाद काय असतात हे श्रेया धारगळकर प्रकरणावरून दिसून येते. याआधीही गोव्यातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचाळवीरांसारखी भाषा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे समाजामध्ये वेळोवेळी खळबळ निर्माण झालेली आहे. पण श्रेया धारगळकर यांच्या विरोधात भाविक आणि धोंडगणांनी उभे केलेले आंदोलन सध्या चर्चेत आहे. फातर्पे प्रकरणावरून सध्या श्रेया धारगळकर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना चार जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दुसरीकडे, शिरगाव येथील देवीच्या भक्तांकडून त्यांच्या विरोधात आवाज उठवला जात असून त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी म्हापसा आणि डिचोलीतील पोलीस ठाण्यावर मोर्चे काढले जात आहेत.

गोमंतक, कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यांसाठी श्री लईराई देवी हे एक श्रद्धास्थान आहे. या देवीला मानणारे लाखो भक्त गोव्यात आहेत. इथली जत्रा हा प्रत्येकासाठी एक वेगळ्या प्रकारचा आनंदसोहळा असतो. देवीभक्तीचा अनुभव आतापर्यंत लाखो भक्तगणांना आलेला आहे. यामुळेच दरवर्षी या भक्तांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसते. या देवीचा महिमा दिवसेंदिवस शीघ्रगतीने वाढत असताना दुसरीकडे श्रेया धारगळकरसारख्या वाचाळवीरांनी असे वक्तव्य करून भाविकांच्या भावना दुखावणे हे अतिशय दुर्दैवी आहे. परधर्मीय दैवतांऐवजी नेहमीच हिंदू दैवतांवर टीका का असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र सध्याचे आक्रमक आंदोलन पाहता पुन्हा असे धाडस सहजासहजी कोणी वाचाळवीर करणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

गोव्यात अनेक बिगर सरकारी संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून अशा समाजविरोधी कारवाया करण्याचे प्रस्थ सुरू झालेले आहे. श्रेया धारगळकर हा त्याचाच एक भाग. असे अनाठायी वाद उकरून आपण समाजाचे रक्षक आहोत अशी प्रतिमा निर्माण करण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न यापूर्वी अनेकवेळा झालेला आहे. त्यांना तेव्हा असे खडतर आव्हान निर्माण झाले नव्हते. पण सध्याच्या आंदोलनांमुळे या वाचाळवीरांना मोठा धक्काच बसला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा वाचाळवीरांच्या संस्थांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. जागतिक स्तरावर शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न वाचाळवीर करत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे गरजेचे आहेच, पण त्याआडून आपणच या समाजाचे तारणहार असल्याचे सांगणारे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. येणाऱ्या काळात सरकारी आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास येणाऱ्या काळातही या वाचाळवीरांना प्रोत्साहन मिळत राहील. त्यामुळे सरकारने आता कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे.

सध्या देवीभक्तांनी दाखविलेले धाडस व केलेले आंदोलन खरोखरच स्वागतार्ह आहे. आपल्या प्रिय दैवतांकडे आपले दुःख दूर करण्याचे व सुखाची अनुभूती पदरात टाकण्याचे सामर्थ्य असते. आयुष्यात दुःखाचा अंधार पसरल्यानंतर सुखाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्ग हा दैवी आराधनेत सापडतो. याच मार्गावर अनाठायी वाद निर्माण करून समाजात चीड निर्माण करण्याचा वाचाळवीरांचा प्रयत्न असतो. असे प्रयत्न या आंदोलनांच्या माध्यमातून नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात गोव्याच्या विकासाच्या आणि शांततेच्या दृष्टिकोनातून सरकारनेही याबद्दल कणखर भूमिका घेणे हे गरजेचे आहे.


उदय सावंत, वाळपई