जीवघेणी उपासमार; २.५ लाख लोक मृत्यूच्या दारात

Story: विश्वरंग |
19th April, 10:19 pm
जीवघेणी उपासमार; २.५ लाख लोक मृत्यूच्या दारात

सुदानमध्ये लष्कर आणि पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात संघर्ष सुरू होऊन वर्ष उलटून गेले आहे. त्यामुळे देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी खार्तूममध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली आणि देशभरात हा हिंसाचार पसरला. त्यामुळे हजारो लोकांचा जीव गेला. तसेच, इमारती आणि पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सुदानमध्ये सध्या उपासमारीचे जगातील सर्वात भयंकर संकट निर्माण झाल्याचे मत संयुक्त राष्ट्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आमच्यासमोर भयंकर संकट निर्माण झालेले आहे आणि ते दिवसेंदिवस अधिक भयंकर होत जाणार अशी आम्हाला भीती आहे, असे जागतिक खाद्य कार्यक्रमाचे सुदानमधील आपत्कालीन समन्वयक मायकल डनफोर्ड म्हणाले. सध्या सुमारे १ कोटी ८० लाख लोक उपासमारीचा सामना करत आहेत आणि हा आकडा २.५ लाखांपर्यंत वाढू शकतो, असेही ते म्हणाले. हा आकडा सुदानमधील लोकसंख्येच्या तुलनेत अर्ध्याहून जास्त आहे. बचावकार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले की, आगामी काही महिन्यांत २ लाख २० हजार लोक उपासमारीमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात.

१५ एप्रिल २०२३ रोजी देशातील लष्कर आणि आरएसएफ यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला, त्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. या ठिकाणी लोकांचे राज्य निर्माण व्हावे म्हणून तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय योजनेमुळे ही ठिणगी पडली होती. संयुक्त राष्ट्रांनी मृतांचा अधिकृत आकडा १४ हजार असल्याचे सांगितले आहे. पण, हा आकडा खूप कमी असून प्रत्यक्षातील आकडा यापेक्षा खूप मोठा असू शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.

सुमारे ८० लाखांहून अधिक लोकांवर घर सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोकांवर देशांतर्गतच विस्थापनाची वेळ आली आहे, तर काहींनी सुदानच्या शेजारच्या देशांत पलायन केले आहे. राजधानी खार्तूमसह ओमदुरमन आणि बाहरी या जवळजवळ असलेल्या शहरांचा मिळून ग्रेटर खार्तूम भाग तयार होतो. संघर्षापूर्वीपर्यंत याठिकाणी सुमारे ७० लाख लोक राहत होते.

शहराच्या बहुतांश भागावर आरएसएफने ताबा मिळवला आहे. पण, सैन्याने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी आता ओमदुरमनमधील राज्याच्या टीव्ही मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. यामध्ये दुकाने, रुग्णालये, विद्यापीठे आणि बँकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. नष्ट झालेल्या इमारतींमध्ये प्रसिद्ध ग्रेटर नाईल पेट्रोलियम ऑइल कंपनी टॉवरचा समावेश आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हे टॉवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. तसेच, किमान तीन रुग्णालये आणि एका विद्यापीठाचेही या संघर्षामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सुदानमधील आर्थिक तज्ज्ञ वेल फाहमी यांनी युद्धाचा अर्थव्यवस्था आणि खाद्य यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला असल्याचे म्हटले आहे. अर्थव्यवस्था निम्म्याने आकुंचन पावली आहे आणि कृषी क्षेत्रातली सुमारे ६० टक्के कामे थांबली आहेत, असे ते म्हणाले. जागतिक खाद्य कार्यक्रमातही तशीच निराशा आहे. सुदानमध्ये आज जे काही घडत आहे ती मोठी शोकांतिका आहे. ते आता मर्यादेपलीकडे गेले आहे, असे डनफोर्ड म्हणाले.


- सुदेश दळवी, गोवन वार्ता