गिरकरवाडा-हरमल येथील १२५ बांधकामे होणार जमीनदोस्त

हरमल पंचायतीने घेतला ठराव : २४ रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 12:07 am
गिरकरवाडा-हरमल येथील १२५ बांधकामे होणार जमीनदोस्त

पणजी : गिरकरवाडा-हरमल येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारलेल्या २१६ बेकायदेशीर बांधकामापैकी १२५ बांधकाम जमीनदोस्त करण्याचा ठराव हरमल पंचायतीने घेतल्याची माहिती गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. दरम्यान, अशोक कंदारी यांनी सर्वे क्र. ६३/९२ मध्ये उभारलेली चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी ठेवली आहे.
गिरकरवाडा-हरमल येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रात उभारलेल्या बेकायदेशीर बांधकामांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने या प्रकाराची स्वेच्छा दखल घेतली. या स्वेच्छा याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी हरमल पंचायतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून १२५ बांधकामे जमीनदोस्त करण्याचा ठराव पंचायतीने घेतला आहे. यातील ८८ बांधकामांना नोटीस जारी करण्यात आली आहे. तर राहिलेल्या बांधकामासंदर्भात पुढील १५ दिवसांत जमीनदोस्तचा आदेश जारी करण्यात येणार अाहे. याशिवाय राहिलेल्या ९१ बांधकामांपैकी २१ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ३० दिवसांत त्या निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती पंचायतीचे वकील दीपक गावकर यांनी न्यायालयात दिली.
दरम्यान, माजी सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांचे कुटुंबीय, नातेवाईकांनी १० तात्पुरती बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. तर अशोक कंदारी यांनी सर्वे क्र. ६३/९२ मध्ये उभारलेली चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून काही प्रमाणात माती राहिली असून ती पुढील दिवसात काढण्यात येणार असल्याची माहिती कंदारी यांच्यातर्फे वकील साजल धमिजा यांनी उच्च न्यायालयात दिली. याची दखल घेऊन या संदर्भातील पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी ठेवली आहे.      

हेही वाचा