चांगल्या कायद्यांच्या अंमलबजावणीने देशाची प्रगती!

अवधूत तिंबलो : मडगावातील कार्यक्रमात मित्र परिवाराकडून सत्कार


13th April, 12:23 am
चांगल्या कायद्यांच्या अंमलबजावणीने देशाची प्रगती!

उद्योजक अवधूत तिंबलो यांचा सत्कार करताना दत्ता नायक. सोबत अरविंद भाटीकर, अंजू तिंबलो, अॅड. क्लिओफात आल्मेदा, माधव कामत, अॅड. झिलमन परेरा.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : चांगले कायदे अमलात आल्यासच देश व समाज प्रगती करू शकतो. दीडशे वर्षांचा मिनरल कोड काढून टाकण्यात आला. समान नागरी कायदा असल्यामुळे राज्यात शांतता नांदते. हा कायदा देशभरात लागू केला जात असल्याबाबत पंतप्रधानांचे अभिनंदन करावे लागेल. भविष्यात चांगला मिनरल कोड आल्यास चांगले मायनिंग होऊ शकते. समाजाच्या प्रगतीसाठी काही कायद्यात बदलाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो यांनी व्यक्त केले.
उद्योजक अवधूत तिंबलो यांच्या मित्रपरिवारातर्फे ७५ व्या वाढदिनाचे औचित्य साधून मडगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता नायक, अरविंद भाटीकर, अंजू तिंबलो, अॅड. क्लिओफात आल्मेदा, माधव कामत, अॅड. झिलमन परेरा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अवधूत तिंबलो यांनी सर्वांसमोर आपला जीवनपट मांडतानाच हा सत्कार म्हणजे ‘मडगावचे नोबल पारितोषिक’ आहे, असे सांगितले.
राष्ट्रवाद देशभक्तीपेक्षा वरचढ होत आहे. देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हाही देशद्रोहाचे आरोप होत होते. त्यामुळे अशा अडचणींतून बाहेर पडण्यासाठी कायद्याचा आधार लागतो. अंजू यांच्याशी लग्न झाले व घरातून प्रगतीसाठी आणखी आधार मिळाला. श्रीमंत लोक हवेत; पण ते सामाजिक बांधिलकी जपणारे हवेत. पर्यावरणाबाबतची बांधिलकीही जपण्याची गरज आहे, असे तिंबलो म्हणाले.
उद्योजक अवधूत तिंबलो यांनी केलेले कष्ट व अंजू तिंबलो यांचा त्यांना मिळालेला पाठिंबा हेच त्यांच्या प्रगतीमागील कारण आहे. त्यांच्याही जीवनात अनेक अडचणी आल्या, त्यावर मात करत मार्ग शोधत त्यांनी यश मिळवले, असे झिरमन परेरा यांनी सांगितले.
अवधूत तिंबलो यांचे कार्य स्तुत्य : माधव कामत
फोमेंतो स्कॉलर्सच्या माध्यमांतून तिंबलो कुटुंबाने गोव्यातील मुलांना परदेशात शिकण्याची संधी दिल्याचे अरविंद भाटीकर यांनी सांगितले. अॅड. क्लिओफात म्हणाले, तिंबलो यांचे कोकणीवर प्रेम आहे. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे विचारांनी समृद्ध होणे. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावरही यावे. माधव कामत म्हणाले, संगीत, साहित्य, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांतील अवधूत तिंबलो यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. केवळ पैसा कमावला नाही तर समाजकल्याणासाठीही त्यांनी सातत्याने काम केले.
सामाजिक बांधिलकी जपली : अंजू तिंबलो
अंजू तिंबलो म्हणाल्या, पती अवधूत तिंबलो हे आपले चांगले मित्र, मार्गदर्शक आहेत. ५० वर्षांची साथ देतानाच आम्ही अनेक अडचणींतही सोबत राहिलो. महाविद्यालयीन शिक्षणावेळी त्यांची ओळख झाली. त्यांच्याशी संवाद, मैत्री वाढत गेली व नंतर लग्न केले. पारंपरिक व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.       

हेही वाचा