पणजी : हिंदू नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.
पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया 
मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्नोति’पासून निष्पन्न झाला. 
प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.
पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
ही कालगणना नेमकी कुणी सुरू केली?
२००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमणं व्हायची. याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा त्यावेळी सत्तेवर होता. गौतमीपुत्र असं नाव लावणारे राजे त्या वेळच्या मातृसत्ताक पद्धतीचे अनुकरण करणारे असल्याचेही काही अभ्यासक मानतात.
पुरातन पैठण शहराचा उल्लेख सुवर्णयुग म्हणून केला जातो.
इतिहास अभ्यासकांनुसार, गौतमीपुत्राने या शक - क्षत्रप राजाचा हल्ला परतवून लावला आणि त्याचा युद्धात पराभव केला. हे वर्ष होतं इसवी सन ७८. आत्ताच्या नाशिकच्या परिसरात हे युद्ध लढले गेले. सातवाहनांच्या साम्राज्याची राजधानी होती पैठण. महाराष्ट्राचे सुवर्णयुग असेही या तत्कालीन वैभवशाली पैठणनगरीचं वर्णन केले जाते. 
गौतमीपुत्र सातवाहनाचा पराक्रम
इतिहासतज्ज्ञ प्रभाकर देव यांचा प्राचीन भारताचा गाढा अभ्यास आहे. ते नांदेड इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी म्हटलं होतं, "इसवी सनपूर्व २३६च्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य स्थापन झालं. सातवाहनांतील सगळ्यांत श्रेष्ठ सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांचे नाव घेतले जाते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन ७२ ते ९५ या काळात हा सत्तेवर होता. या राजाशी संबधित एक शिलालेख नाशिकच्या लेण्यांमध्ये सापडला आहे." पुढे "मौर्यांच्या साम्राज्यानंतर कुशान, हूण, पल्लव, शक यासारख्या परकीय टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केलं. दक्षिण भारताला या परकीय आक्रमणातून वाचवण्याचं काम हे गौतमीपुत्रानं केले . गौतमीपुत्रानं शकांचा पराभव केला आणि त्या वेळेपासूनच शालिवाहन शक ही कालगणना सुरू झाली," असे प्रभाकर देव यांनी सांगितलं होतं.
सातवाहन, सालाहन, साळीहन आणि शालिवाहन इत्यादि
"शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असे म्हटले आहे. त्याचे संस्कृतीकरण जेव्हा झाले, तेव्हा ते शालीवाहन झाले," असे शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना उल्लेख केला होता. 
या साम्राज्याचा बाविसावा राजा गौतमीपुत्र हा अतिशय पराक्रमी होता. त्याने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. गौतमीपुत्र आणि शकांमध्ये साम्राज्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी घनघोर युद्ध झालं. या युद्धात गौतमीपुत्रानं शक-शत्रप घराण्यातल्या नहपान या राजाचा समूळ पराभव करून त्याला मारून टाकले .सातवाहनांनी शकांच्या प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शके कालगणना सुरू झाली. गौतमीपुत्राने प्रतिस्पर्धी शक शत्रप यांचा पराभव करून आपली नाणीही प्रचारात आणली
पैठणच्या सातवाहन आडनावाच्या कोणा राजाने शक लोकांचा पराभव ज्या वर्षी केला त्या वर्षापासून ही कालगणना पद्धती सुरू झाली. सातवाहनाने मातीचे घोडे व शिपाई करून त्यांच्याकरवी शकांचा पराभव केला, अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा अर्थ मी असा करतो – “शक लोकांचा अंमल महाराष्ट्रावर दोन हजार वर्षांपूर्वी जुन्नर वगैरे स्थळी राज्ये स्थापून जेव्हा झाला, तेव्हा महाराष्ट्रातील लोक मातीप्रमाणे निर्वीर्य व हतप्रभ झाले होते. अशा लोकांना उत्तेजन देऊन पैठणच्या सातवाहन राजाने शकांचा उच्छेद केला. शिवाजीने मावळ्यांच्या करवी जसा मोगलांचा पराभव केला तसा. शकांच्या या पराभवाला उद्देशून या कालगणना पद्धतीस “शालिवाहनकृत शकपराभवकाल’ असे त्या वेळी लोक म्हणू लागले व “शालिवाहन शककाले’ असा प्रयोग होऊ लागला. “शालिवाहनशक’ या सामासिक शब्दाचे “शालिवाहन शक’ असे विशेषण होते. नंतर कालांतराने या लांबलचक सामासिक शब्दाचा संक्षेप “शककाले’, “शकवर्षे’, “शके’ असा उत्तरोत्तर होत गेला – तेव्हा शालिवाहन शककाल आपणा मराठ्यांचा मोठ्या अभिमानाचे द्योतक आहे.” असे एके ठिकाणी प्राख्यात इतिहासकार राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे. 
चष्टन राजाने सुरू केला शक?
पुण्यातील इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा वेगळी माहिती दिली. त्यांनी म्हटलं होतं की, "सातवाहन राजाने शकांना हरवलं आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे. शक हे इराणधून - तिथल्या सिथिया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा होत्या. शहरांपैकी नहपान याचं गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक इथंही राज्य करत होता. त्याच्या संदर्भातील शिलालेख पांडव लेण्यात सापडतात. नाशिकजवळ गोवर्धन इथं गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि क्षहरातांचा निर्वंश केला. त्यानंतर सातवाहन राजांनी नाशिक जवळील नहपानाचं राज्य आपल्या अखत्यारीत घेतलं." असे इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार म्हणतात. 
"गुजरातधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन ७८मध्ये चष्टनने स्वतःचे राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने काढलेल्या नाण्यांवर शकाचा पहिला उल्लेख आढळतो. तो त्याच्या वंशातल्या राजांनी ३०० वर्षं वापरला. पुढे वाकाटक राजा देवसेन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्या लेखातही आपल्याला शकाचा (शालिवाहन शक नव्हे) उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात शालिवाहन हे त्याला जोडलं गेलं आहे."
जुन्नरच्या लेण्यांध्येही शिलालेख
"जुन्नर आणि परिसरातल्या लेण्यांमध्ये या काळाशी संबधित शिलालेख मिळाले आहेत. रोमच्या व्यापारावर आपलं वर्चस्व असावं यासाठी त्याकाळी लढाया व्हायच्या. गौतमीपुत्राने नहपानावर वर्चस्व मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक नाण्यावर आपले शिक्के मारले", असं सायली पलांडे दातार म्हणाल्या. जर्मनीचे डॉ. हॅरी फाल्क हे इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवीन माहिती समोर आल्याचं सायली यांनी सांगितलं होतं.
शालिवाहन शके आणि मराठी नववर्ष
सातवाहनकालीन दरबारी पंडित गुणाढ्य यांनी ‘बृहत्कथा’ लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.
प्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ दिले.त्यांनी म्हटले होते की, "पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचे वर्णन केले आहे."
"पैठणचा उल्लेख तो ‘पैतान’ असे करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथे गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही २००० वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरे होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची," देव सांगतात.
४५० वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण
शालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव यांनी व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं होतं, या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. १२०० पैकी ९०० लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती. तिथे मोठी शहरे उदयास आली. याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवाने आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचे साम्राज्य मोठे होते. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो.


