आतिशी म्हणतात, ‘केजरीवालांचे आरोग्य धोक्यात’; तिहार प्रशासन म्हणते, ‘प्रकृत्ती उत्तम’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 01:17 pm
आतिशी म्हणतात, ‘केजरीवालांचे आरोग्य धोक्यात’; तिहार प्रशासन म्हणते, ‘प्रकृत्ती उत्तम’

नवी दिल्ली : तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा खळबळजनक दावा दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी आज केला आहे. मात्र, तिहार कारागृह प्रशासनाने त्याचा दावा फेटाळून लावला असून केजरीवाल यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्ली दारू उत्पादन धोरणात घोटाळा झाल्याच्या संशयावरून केजरीवाल २१ मार्चपासून कोठडीतच आहेत. यामुळे त्यांचे वजन साधारण ४.५ किलोने घटले आहे. त्यांना आधीच मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे. तिहार कारागृहात त्यांचे आरोग्य आणखी धोक्यात आले आहे, असा आरोप आज सकाळी आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली.

आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तिहार कारागृह प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लगेच खुलासा केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पूर्णपणे ठीक आहेत. त्यांची शुगर लेव्हल नियंत्रणात आहे. रक्तदाबही नियंत्रणात आहे. शिवाय, त्याचे वजनही ते तुरुंगात असताना जेवढे होते तेवढेच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केजरीवाल यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात पोहोचले तेव्हा त्यांचे वजन ५५ किलो होते. आताही त्यांचे वजन ५५ किलो आहे. त्याचवेळी तुरुंगात केजरीवाल यांची शुगर आणि बीपीही तपासण्यात आली. साखरेची पातळी १४० आहे, तर बीपी ११६/८० आहे. अशा प्रकारे त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे तुरुंग प्रशासनाने नमूद केले आहे.

हेही वाचा