गतवर्षीच्या तुलनेत राज्याच्या जीएसटी संकलनात १८ टक्क्यांनी वाढ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:50 am
गतवर्षीच्या तुलनेत राज्याच्या जीएसटी संकलनात १८ टक्क्यांनी वाढ

पणजी : गतआर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा राज्याच्या जीएसटी संकलनात १७.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थखात्याकडून ही माहिती मिळाली आहे. यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोव्याने ४९३२.६३ कोटी रुपये जीएसटी संकलन केले होते. २०२३-२४ मध्ये हेच संकलन ५८१९.४३ कोटी रुपये होते.
खात्याने दोन्ही आर्थिक वर्षांसाठी जानेवारी महिन्यातील राज्यनिहाय जीएसटी संकलनाची माहिती दिलेली नाही. गेल्या काही वर्षांत राज्यात पर्यटन व अन्य व्यवसाय वाढीबरोबरच जीएसटी संकलनातही वाढ होत आहे. २०२२-२३ मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सरकारला जीएसटीद्वारे ९०७ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षात तो वाढून १,०५६ कोटी रुपये झाला होता.
वर्ष निहाय पाहता २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ५१५ कोटी रुपये जीएसटी संकलन मार्च महिन्यात झाले होते. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ४९३ जीएसटी प्राप्त झाला. या वर्षात ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी म्हणजे ३७६ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल २३ मध्ये सर्वाधिक ६२० कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये ५८१ कोटी रुपये जीएसटी प्राप्त झाला होता.
संपूर्ण देशाचा विचार करता २०२३-२४ या आर्थिक वर्षात २०.१४ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. तर २०२२-२३ मध्ये जीएसटीद्वारे १८.०६ लाख कोटी रुपये संकलित केले होते. २०२३-२४ मध्ये महिन्याला सरासरी १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. तर २०२२-२३ मध्ये महिन्याला सरासरी १.५० लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

मार्च महिन्यात ५६५ कोटी रुपये संकलन
खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ मध्ये गोव्याने ५६५ कोटी रुपये जीएसटी संकलन केले आहे. गतवर्षी मार्चमध्ये ५१५ कोटी रुपये प्राप्त झाले होते. ही वाढ १० टक्के आहे.

महिना : २०२२-२३ / २०२३-२४

एप्रिल : ४७०/ ६२०
मे : ४६१ / ५२३
जून : ४२८.६३ / ४८०.४३
जुलै : ४३३ / ५२८
ऑगस्ट : ३७६ / ५०९
सप्टेंबर : ४२९ / ४९७
‍ऑक्टोबर : ४२० / ४६०
नोव्हेंबर ‍ : ४४७ / ५०३
डिसेंबर : ४६० / ५५३
जानेवारी : _ / _
फेब्रुवारी : ४९३/ ५८१
मार्च : ५१५ / ५६५            

हेही वाचा