सूचना सेठ विरोधात ६४२ पानी आरोपपत्र सादर

स्वत:च्या चार वर्षीय मुलाच्या हत्येचे प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:38 am
सूचना सेठ विरोधात ६४२ पानी आरोपपत्र सादर

म्हापसा :स्वत:च्या चार वर्षीय चिन्मय या मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या बंगळुरू येथील माईंडफुल एआय लॅब या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या संस्थापिका सूचना शेठ हिच्या विरोधात कळंगुट पोलिसांनी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
हे आरोपपत्र ६४२ पानी असून त्यामध्ये ५९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी हे आरोपपत्र बाल न्यायालयात सादर केले आहे. सध्या संशयित आरोपी सूचना या कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.
मुलाला वडिलांकडे जाऊ द्यायचे नव्हते म्हणून संशयित सूचना सेठ यांनी हा मुलाच्या हत्तेचा कट रचला व गोव्यात कांदोळी येथे आणून तो सत्यात उतरवला. शिवाय तिची मानसिक स्थिती एकदम ठीक असल्याचा मनोरुग्णालयाचा अहवाल देखील पोलिसांनी या आरोपपत्रा समवेत जोडला असून सूचना ही मानसिक आजारी नाही आणि तिने नियोजनबद्धरीत्या मुलाचा खून केला आहे, असा दावा पोलिसांनी या आरोपपत्रात केला आहे.
गेल्या दि. ७ जानेवारी रोजी चिन्मयच्या खुनाचा प्रकार कांदोळीतील एका गेस्ट हाऊसमध्ये घडला होता. दि. ८ रोजी उत्तररात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चित्रदूर्ग कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने संशयित सूचना हिला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. या खुनाचा छडा लावण्यात कांदोळीतील त्या गेस्ट हाऊसचे कर्मचारी व पर्यटक टॅक्सी चालकाचा मोठा सहभाग होता.
दरम्यान, बंगळुरूमधील कौटुंबिक वाद निवारण न्यायालयाने सूचना सेठ हिचे पती व्यंकटारमण यांना मुलगा चिन्मय याला दर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या काळात भेटण्याची मुभा दिली होती. हा आदेश गेल्या दि. २० नोव्हेंबर २०२३ मध्ये दिला होता. त्यानंतर सूचना हिने पिता-पुत्राची सुरुवातीचे तीन रविवार भेट घडवून आणली. पण, त्यानंतर सलग चार रविवार तिने दोघांची भेट होऊ दिली नव्हती आणि पाचव्या रविवारी मुलाची हत्या केली होती.             

हेही वाचा