महामार्गावर उभारलेल्या फलकांवरील गावांची नावे दुरुस्त करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th March, 12:42 am
महामार्गावर उभारलेल्या फलकांवरील गावांची नावे दुरुस्त करण्याची मागणी

वास्को : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर काही ठिकाणी गावांचे नामफलक उभारताना नावातील चुका दुरुस्त केल्या आहेत. परंतू जुन्या नामफलकावरील चुका अद्याप तशाच असल्याने पर्यटकांचा गोंधळ उडत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने या गोष्टींकडे लक्ष देऊन चुका असलेले जुने नामफलक बदलण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गोव्यात ठिकठिकाणी गावांचे नामफलक उभारताना बऱ्याच चुका केल्या आहेत. त्यामुळे गावांचे मूळ नाव बदलण्याची किमया प्राधिकरणाने केली आहे. प्राधिकरणाच्या गावातील नावांतील अपभ्रंशामुळे काहीठिकाणी नावांमध्ये विनोद तयार झाले आहेत. परंतू आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन नामफलक उभारताना काळजी घेतली आहे. त्यांनी गाव, स्थळांची नावे योग्यरित्या लिहली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दाबोळी झुआरीनगर मार्गावर नवीन नामफलक उभारताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मडगाव, फोंडा, पणजी अशी नावे हिंदी व इंग्लिशमध्ये योग्यरित्या लिहली आहेत. त्यांनी नावे लिहताना शुध्दलेखनाच्या चुका टाळल्या आहेत. तथापी काही ठिकाणी अद्याप जुने नामफलक नजरेस पडतात. येथील दाबोळी-बोगमाळो चौकात उभारण्यात आलेल्या नामफलक कमानीवरील नावे अद्याप विचित्र पद्धतीने लिहलेली दिसून येतात. मडगावचे मार्गो, बोगमाळोचे बोग्मलो, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटचे वर्ना इंडस्ट्रियल इस्टेट अशी नावे वाचून स्थानिक कपाळाला हात लावतात. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून जुने व चुका झालेले नामफलक बदलण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

हेही वाचा