धेेंपो एससीविरुद्ध स्पोर्टिंग क्लबचा पराभव

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March, 12:47 am
धेेंपो एससीविरुद्ध स्पोर्टिंग क्लबचा पराभव

वास्को : स्पोर्टिंग क्लब दी गोवाला बुधवारी वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात धेंपो एससीकडून ०-१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. धेंपोच्या युवा संघाने वेगवान खेळ करत पहिल्या सत्रात स्पोर्टिंगच्या बचावफळीची सातत्याने परीक्षा पाहिली. धेंपोकडून फसीन पीके याने ४७व्या मिनिटाला गोल केला. स्पोर्टिंगला वर्चस्वानंतरही गोलाने हुलकावणी दिली.
सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये चेंडू दूर ढकलण्याच्या प्रयत्नात स्पोर्टिंगचा गोलरक्षक भास्कर जल्मीने धेंपोचा स्ट्रायकर आर्नोल्ड ऑलिवेराकडे चेंडू सोपविला. पण, त्याला गोल करणे शक्य झाले नाही. १८व्या मिनिटाला धेंपोचा संघ गोल नोंदविण्याच्या जवळ पोहोचला होता. परंतु, अ‍ॅरोन बार्रेटोने लगावलेला फटका साईड नेटला लागल्याने गोलरक्षक भास्करने सुस्कारा सोडला. स्पोर्टिंगला लय गवसण्यासाठी थोडा वेळ लागला. पण, त्यांना लय गवसताच धेंपोला बॅकफटूवर जावे लागले. डॉयल आल्वेस गोल नोंदविण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. परंतु, त्याच्या फटक्यामध्ये अपेक्षित गती नव्हती. मध्यंतरापूर्वी लॉईड मास्कारेन्हास याचा फटका देखील दिशाहीन ठरला.
मध्यंतरानंतर दोनच मिनिटांनी बचावपटू फसीन याच्या मैदानालगतच्या फटक्याने गोलरक्षक भास्करला चकवले. हा गोल निर्णायक ठरला. स्पोर्टिंगने यानंतर तासाभराचा खेळ झालेला असताना आक्रमण केले. विदिप्त दुआने लगावलेला हेडर कॉर्नरसाठी बाहेर ढकलण्यात आला. यानंतर खेळाडूंनी धेंपोच्या हँडबॉलसाठी केलेल्या अपीलकडेही दुर्लक्ष करण्यात आले. स्पोर्टिंगने शेवटच्या पंधरा मिनिटांत गती वाढवली. पण, धेंपोचा बचाव त्यांना भेदता आला नाही.

या विजयासह धेंपो एसीसी संघ गुणतालिकेत १९ सामन्यांतून ३७ गुणांसह पहिल्या स्थानी पोचला आहे. तर ३४ गुणांसह स्पोर्टिंग क्लब दी गोवा चौथ्या स्थानावर आहे.