केजरीवालांची अटक ही भाजपची हुकूमशाही : युरी आलेमाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th March, 11:48 pm
केजरीवालांची अटक ही भाजपची हुकूमशाही : युरी आलेमाव

पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे भाजपच्या हुकूमशाहीचे प्रतीक आहे. या दडपशाहीविरोधात सर्वांनी एकत्र येणे आवश्यक अाहे, असे आवाहन गोव्यातील काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

मंगळवारी आझाद मैदानात केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत आलेमाव बोलत होते. यावेळी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे नेते व्हेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, एल्टन डिकोस्टा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप सरकार विरोधकांचा आवाज दडपून टाकत आहे. भाजप विरोधात कोणी बोलले तर आधी ते त्या व्यक्तीला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. ते शक्य झाले नाही तर ईडी, सीबीआय यांच्याकरवी त्यांना अटक करण्यात येते. आज केजरीवाल यांच्यावर ही परिस्थिती आहे. कदाचित उद्या सर्वसामान्यांवर ही वेळ येऊ शकते. देशात संविधान, लोकशाही वाचवायची असेल तर, जनतेने भाजप विरोधात एकत्र येणे आवश्यक आहे, असे युरी यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक करणे ही गोष्ट देशात प्रथमच घडली असेल. केजरीवाल यांच्या विरुद्धचा खटला अनेक दिवस सुरू होता. त्यांना अटक करायचीच होते तर, यापूर्वीही करता आली असती. जे दिल्लीत झाले, ते उद्या गोव्यात देखील होऊ शकते. लोकशाहीमध्ये विरोधक असणे आवश्यकच आहे. तसे नसेल तर भारताचा पाकिस्तानप्रमाणे ‘बनाना रिपब्लिक’ होऊन जाईल, असे सरदेसाई यावेळी म्हणाले.

आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात गोव्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आमची एकी पाहून भाजप सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आमच्यावर देखील अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमची एकी कायम राहील. लोकसभेच्या दोन्ही जागांवर इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे.

आझाद मैदानात प्रवेश नाकारला

सुरुवातीला इंडिया आघाडीच्या सदस्यांनी परवानगी घेतली नसल्याचे कारण देत आझाद मैदानाच्या गेटवर त्यांना पोलिसांनी रोखले होते. मात्र, ही जाहीर सभा किंवा आंदोलन नसून केवळ पत्रकार परिषद असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना आत सोडण्यात आले. 

हेही वाचा