शिखरच्या पंजाबची दिल्लीवर सरशी

कमबॅक करणाऱ्या पंतला पराभवाचा धक्का : करन, लिव्हिंगस्टोनची आक्रमक खेळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th March, 12:36 am
शिखरच्या पंजाबची दिल्लीवर सरशी

चंदीगड : आयपीएल २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात शिखर धवनच्या पंजाब संघाने यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयाने केली. तर कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतला पराभवाचा धक्का बसला आहे. या सामन्यात सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबने दिल्लीचा चार विकेटने पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान पंजाबने अखेरच्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. पंजाबसाठी सॅम करनने ६३ धावांची शानदार खेळी केली. तर लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूत नाबाद ३८ धावांचे योगदान दिले.  

सॅम करनने विजय खेचून आणला

सॅम करनने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले. करनने फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने ४७ चेंडूमध्ये ६३ धावांची मॅच विनिंग खेळी केली. आपल्या खेळीमध्ये त्याने एक षटकार आणि सहा चौकारांचा पाऊस पाडला. सॅम करनने पंजाबसाठी विजय खेचून आणला. त्याला लियाम लिव्हिंगस्टोनने तीन षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ३८ धावा काढून चांगली साथ दिली.


चांगल्या सुरुवातीनंतरही पंजाबची घसरण 

दिल्लीने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन २२ धावा काढून परतला. तर दुसरा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो ९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या प्रभसिमरनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुलदीप यादवने तंबूत धाडले. शिखर धवनने १६ चेंडूमध्ये २२ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. तर जॉनी बेअरस्टोने ३ चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या. तो दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. प्रभसिमरनने १७ चेंडूंत २६ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या पाच चौकारांचा समावेश आहे. उपकर्णधार जितेश शर्मालाही मोठी खेळी करता आली नाही. तो ९ चेंडूत ९ धावा काढून बाद झाला.

षटकार मारत विजय मिळवून दिला 

जितेश शर्मा बाद झाल्यानंतर सॅम करनने लियाम लिव्हिंगस्टोनच्या साथीने डावाला आकार दिला. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ईशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत झाली होती. त्याचा फायदा सॅम करन आणि लिव्हिंगस्टोन यांनी घेतला. दोघांनी ४२ चेंडूमध्ये ६७ धावांची भागिदारी केली. पंजाबसाठी ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. सॅम करन आणि शशांक सिंह लागोपाठ बाद झाल्याने सामन्यात रंगत येईल की काय असे झाले होते. पण लिव्हिंगस्टोनने षटकार मारत विजय मिळवून दिला.

दिल्लीची खराब गोलंदाजी 

दिल्लीतर्फे खलील अहमद महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४३ धावा दिल्या. खलील अहमदने दोन विकेट घेतल्या. इशांत शर्माने २ षटकात एक विकेट घेतली. कुलदीप यादवने भेदक मारा केला. त्याने ४ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने भेदक मारा केला, पण त्याला विकेट मिळाली नाही. मिचेल मार्शने चार षटकांत ५२ धावा खर्च केल्या.

पंजाब किंग्सचा पुढचा सामना २५ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे. त्यानंतर ३० मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सशी आणि ४ मार्च रोजी गुजरात टायटन्सशी सामना होणार आहे.

दिल्लीच्या अभिषेक पोरेलची वादळी खेळी

दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने रिषभ पंतची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलेल्या अभिषेक पोरेलने अखेरच्या षटकात २५ धावा काढल्या. हर्षल पटेलला त्यानेे शेवटच्या षटकामध्ये ३ चौकार आणि २ षटकार मारले. याच्या जोरावरच त्याने १० चेंडूमध्ये ३१ धावा केल्या. अभिषेकने २०२३ च्या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी ४ मॅच खेळल्या होत्या. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने चार सामन्यात ३३ धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात एकाच षटकात त्याने २५ धावा काढून आपली क्षमता दाखवून दिली आहे.