कोलकाताचा हैदराबादवर सनसनाटी विजय

आंद्रे रसेल-रिंकू सिंहची विस्फोटक खेळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th March, 12:32 am
कोलकाताचा हैदराबादवर सनसनाटी विजय

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर ४ धावांनी सनसनाटी विजय मिळवला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. मात्र, हैदराबादला त्या धावा करता आल्या नाहीत. केकेआरने अशाप्रकारे १३व्या हंगामात विजयाने सुरुवात केली. हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे आव्हान होतं. हेनरिक क्लासेनने हैदराबाजला विजयापर्यंत पोहचवले. मात्र तो बाद होताच सामना फिरला. हेनरिकने ६३ धावा केल्या. सूयश शर्माने हेनरिकचा घेतलेला कॅच टर्निंग पॉइंट ठरला आणि कोलकाताने हा सामना जिंकला.
केकेआरची फलंदाजी
आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या जोडीने केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे आव्हान दिले. केकेआरने २० षटकांत ७ विकेट्स गमावून २०८ धावा केल्या. आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह या दोघांनी स्फोटक खेळी केली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. रसेलने अखेरपर्यंत नाबाद राहत २५ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंहने आंद्रेला चांगली साथ देत २३ धावांचे योगदान दिल‍े. त्याआधी रमनदीप सिंहने ३५ धावांची खेळी केली. तर सलामीवीर फिलिप सॉल्टने ५४ धावा केल्या.
कर्णधार श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. वेंकटेश अय्यर ७ धावा करून माघारी परतला. तर सुनील नरेनने आपली विकेट गिफ्टमध्ये दिली. नरेन २ धावांवर धावबाद झाला. तर सनरायजर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक ३ गडी बाद केेले. मयंक मारकांडे याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर क‍र्णधार पॅट कमिन्सला १ विकेट मिळाली.
सेल-रिंकूचा झंझावात
रसेलने केकेआरकडून मोसमातील पहिल्या सामन्यात खेळताना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध वादळी खेळी केली. आंद्रेने २० चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने केलेल्या या खेळीमुळे केकेआरला २०० पार पोहोचता आले. रसेलने या खेळीत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २० चेंडूत २५० च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केले. आंद्रेच्या आयपीएल कारकीर्दीतील हे १० वे अर्धशतक ठरले. विशेष म्हणजे रसेलने हे अर्धशतकही सिक्स ठोकून पूर्ण केले. रसेलने या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. रिंकू सिंहनेही रसेलला दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. रिंकूने १५ चेंडूत ३ चौकारांसह २३ धावांची निर्णायक खेळी केली. रिंकू आणि आंद्रे या दोघांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची ताबडतोड भागीदारी केली.