भोम ग्रामसभेत ठराव : मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना पाठवणार पत्र
भोम येथे स्वस्त धान्य दुकानाच्या प्रश्नावर आक्रमक होताना ग्रामस्थ.
फोंडा : भोम ग्रामसभेत राष्ट्रीय महामार्ग, बाणस्तारी येथील मार्केट प्रकल्प, बेकारी भत्ता व अन्य महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. राष्ट्रीय महामार्गासंबंधी ग्रामस्थांना खरे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री व अन्य संबंधिताना पत्रे पाठवण्याचा ठराव घेतला.
सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत राष्ट्रीय महामार्गासंबधी चर्चा झाली. बांधकाम खात्याने स्थानिक लोकांना अजूनपर्यंत खरे प्रात्यक्षिक दाखविले नाही. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय महामार्गासंबंधी स्थानिक लोकांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी मुख्यमंत्री, बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग व अन्य संबंधित खात्यांना पत्रे पाठविण्याचा ठराव घेतला आहे.
बाणस्तारी येथील मार्केट प्रकल्पात अजूनपर्यंत स्वस्त धान्य दुकानाला जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे संस्थेला दर महिन्याला १८ हजार रुपये भाड्याच्या खोलीसाठी द्यावे लागत आहेत. परंतु स्वस्त धान्य दुकानासंबंधी दक्षता खात्याकडे तक्रार असल्यामुळे पंचायतीने अजूनपर्यंत दुकान वितरित केले नसल्याचे सरपंच दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले.
स्वस्त धान्य दुकानाला मार्केट प्रकल्पात जागा देण्यासाठी पंचायत मंडळाने सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. पण स्वस्त धान्य दुकानासंबंधी काही जणांनी दक्षता विभागात तक्रार केली आहे. तसेच मार्केट प्रकल्पासंबंधी अन्य दोन याचिका न्यायालयात असल्याचे सरपंच दामोदर नाईक यांनी सांगितले.
सरकारने बाणस्तारी येथील मार्केट प्रकल्प पूर्णपणे बेकायदेशीर उभारल्याचे सरपंचांनी सांगितले. पण नंतर सरपंचांना आपली चूक कळून चुकली. पत्रकारांना माहिती देताना सरपंचांनी मार्केट प्रकल्पासंबंधी तीन याचिका असल्याने प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा समज लोकांना झाला असल्याचा दावा केला.
बेरोजगार भत्ता द्या!
पंचायत क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असल्या, तरी स्थानिक लोकांना त्या ठिकाणी काम मिळत नाही. तसेच कंपन्यांच्या प्रदूषणाला स्थानिकांना बळी पडावे लागते. त्यामुळे सरकारने पंचायत क्षेत्रातील युवकांना बेरोजगार भत्ता द्यावा, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.