मडगाव कार्निव्हल दरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल काँग्रेसची तक्रार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th February 2024, 04:44 pm
मडगाव कार्निव्हल दरम्यान कर्तव्यात कसूर केल्याबद्दल काँग्रेसची तक्रार

मडगाव : येथे काल (ता. ११) झालेल्या कार्निव्हल परेड दरम्यान लहान मुलांसह लोकांचा जीव धोक्यात आणत सरकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला, अशी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसने आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी खजिनदार ऑरविल दौराद आणि ओलेन्सिओ सिमोयस यांच्यासह दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांच्याकडे तक्रार सुपूर्द केली आणि जुन्या हॉस्पिसियो हॉस्पिटलाच्या बाजूला असलेल्या अर्धवट कोसळलेल्या भिंतीवर धोकादायकपणे बसलेल्या लहान मुलांसह इतर लोकांची घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

मडगाव येथे पर्यटन खाते, मडगाव नगरपालिका आणि इतरांच्या संयुक्त विद्यमाने गोवा सरकारने आयोजित कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बसलेल्यांची घटना चिंताजनक असल्याचे काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे.

समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या विविध व्हीडीओवर लहान मुले आणि लोक जमिनीपासून सुमारे १५ ते २० फूट उंच असलेल्या भिंतीवर धोकादायकपणे बसलेले दिसतात. एवढ्या उंचीवरून पडणे जीवघेणे ठरू शकते, असे काँग्रेस पक्षाने आपल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

काँग्रेस पक्षाने याआधीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्धवट कोसळलेल्या भिंतीवर लहान मुले आणि इतर बसलेले स्पष्टपणे दिसत असलेला व्हिडिओ अपलोड केला असून दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईची मागणी केली आहे, असे पत्रात पुढे म्हटले आहे.

लोकांचा; विशेषतः लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही ही अधिकृत तक्रार तुमच्यासमोर सादर करत आहोत. गोवा सरकारचे पर्यटन खाते, मडगाव नगरपालिका, गोवा पोलीस तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सहयोगी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा आणि कर्तव्यात दुर्लक्ष झाले आहे, असे मोरेनो रिबेलो यांनी त्यांच्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

आम्हाला आशा आहे की आयोजकांनी सदर परेड आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानग्या घेतल्या असतील. कार्निव्हल परेड २०२४ साठी मडगावमध्ये दिलेल्या सर्व परवानग्या आणि कार्निव्हल मिरवणुकीवेळी आयोजकांनी पाळण्यासाठी घातलेल्या अटी आणि नियमांच्या प्रती आम्हाला द्याव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

वरील घटनेचे गांभीर्य ओळखावे आणि आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी. आम्हाला १५ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल द्यावा, असे न झाल्यास आम्हाला योग्य मंचाकडे जाण्यास भाग पडेल, असे मोरेनो रिबेलो यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने सादर केलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.